ऑनलाइन लोकमत
गुडगाव, दि. 10 - मारुती सुझूकीच्या मानेसर येथील प्लांटमध्ये 2012 रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणी हरियाणामधील गुडगाव न्यायालयाने 13 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. इतर चार जणांना पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इतर 14 आरोपींनी शिक्षेचा कार्यकाळ पुर्ण केला असल्याने त्यांची सुटका कऱण्यात आली आहे.
न्यायालयाने 10 मार्च रोजी 31 जणांना दोषी ठरवलं होतं. तर 117 जणांची निर्दोष म्हणून सुटका करण्यात आली होती. आरपी गोयल यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला होता. यासाठी 505 पानांचं निकालपत्र तयार करण्यात आलं होतं. 148 आरोपींपैकी 90 जणांचा नाव एफआयरमध्ये नव्हतं. दोषींना आज शिक्षा सुनावण्यात येणार होती. त्यानुसार न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
18 जुलै 2012 रोजी मारुती सुझूकीच्या मानेसर प्लांटमध्ये उपोषणादरम्यान झालेल्या हिंसाचारात मॅनेजमेंटचे 98 लोक जखमी झाले होते. यावेळी जनरल मॅनेजर अवनीश देव यांनी जिवंत जाळण्यात आलं होतं. त्यांचा नंतर मृत्यू झाला. प्लांटचा अर्ध्याहून जास्त भाग जळून खाक झाला होता. परिसरात मोठ्या प्रमाणात तोडफोड कऱण्यात आली होती. या घटनेनंतर 525 लोकांनी आपली नोकरी गमावली होती. 148 जणांविरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला होता, ज्यामधील 139 जण जामीनावर बाहेर आहेत.