मुंबई - मराठवाडा मुक्तीसंग्राम किंवा हैदराबाद मुक्तीसंग्राम या लढ्यालाही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याएवढेच महत्व आहे. या लढ्यातही उस्मानाबादपासून ते अंजंठा वेरुळच्या जिल्ह्यातील क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. हैदराबाद संस्थान खालसा करण्यासाठी भारत सरकारने केलेल्या कारवाईला ऑपरेशन पोलो असे म्हटले. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशान्वये 'ऑपरेशन पोलो' ही मोहीम राबवून हैदराबाद संस्थानाचे भारतात विलिनीकरण झाले आणि मराठवाडा मुक्त झाला. त्यामुळेच या लढ्याला मराठवाडा मुक्ती संग्राम असेही म्हटले जाते.
उस्मान अली शाह आसिफ जाह सातवा हा हैदराबाद संस्थानचा त्यावेळचा प्रमुख होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास 535 लहानसहान संस्थाने खालसा करण्यात आली. या सर्व संस्थानांचे स्वतंत्र भारतात विलिनीकरण करण्यात आले. मात्र, हैदराबादच्या निजामाने आपले संस्थान विलिनीकरण करण्यास नकार दिला. त्यावेळी निजामाचा प्रमुख म्हणून कासिम रिजवी हैदराबाद संस्थान पाहात होता. रिजवीने रझाकार नावाची संघटना उभारली होती. जवळपास 2 हजार खासगी सैनिक या संघटनेत निजामासाठी काम करत होते. या संघटनेला पाकिस्तानचे नैतिक समर्थन होते, अशी माहिती आहे. तसेच निजामावर संस्थान खालसा करण्यासाठी भारत सरकारकडून दबाव टाकण्यात आला. त्यावेळी कासिम रिजवीने आणि त्याच्या रझाकार संघटनेने हैदराबादमधील हिंदूंच्या हत्या करण्यास सुरुवात केली. तसेच स्त्रियांवर बलात्कार करण्यात आल्याचाही उल्लेख आहे. कासिम रिजवीच्या या अत्याचाराचा भडका उडल्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्रामचा लढा पुकारण्यात आला. त्यामध्ये सध्याच्या मराठवाड्यातील अनेक क्रांतीकारकांनी हौतात्म पत्कारले.
देशाचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय सैन्य हैदराबादेत पाठवले. त्यावेळी 5 दिवस भारतीय सैन्याने निजामाच्या सैन्याशी दोनहात करत त्यांचा पराभव केला. मेजर जनरल जे. एन. चौधरी, ले.जनरल इ. एम. गोदार्द यांनी या कारवाईची आखणी केली होती. या कारवाईसाठी भारतीय लष्करचे साधारण 36,000 जवान होते. आर्म्ड ब्रिगेड, स्मॅश फोर्स, स्ट्राइक फोर्स, मोर्टर बटालियन, गुरखा रायफल्स, पंजाब रेजिमेंट्स होते. 17 सप्टेंबर 1948 ला निजामानं शरणागती पत्करली. कासिम रिझवी याला अटक झाली. लायक अलि मंत्रिमंडळाचे प्रमुख होते ते पळूनच गेले. 4 दिवस 13 तास चाललेल्या या कारवाईत भारतीय लष्कराचे 32 जवान शहीद झाले तर 97 जखमी झाले होते. अखेर, 17 सप्टेंबर 1948 रोजी म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1 वर्ष 32 दिवसांनी हैदराबाद संस्थान भारतात आले मराठवाड्यात तिरंगा फडकला. दरम्यान, निजामाच्या लष्करात 42,000 सैनिक तर 25,000 रोहिले बाहेरच्या राज्यातून आणले.