मार्च-एप्रिलमध्ये नरेंद्र मोदींच्या ७९, तर राहुल यांच्या ७५ सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 02:45 AM2019-05-01T02:45:05+5:302019-05-01T02:45:41+5:30
२४ राज्यांतील प्रचार दौरा, अमित शहांनीही घेतल्या ५0 सभा, महाराष्ट्रात मोदींच्या ८, राहुल यांच्या ४ तर शहा यांच्या ५ सभा
संदीप आडनाईक
नवी दिल्ली : सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च आणि एप्रिल महिन्यात २४ राज्यांत जवळपास ७९, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ७५ तर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी जवळजवळ ५0 प्रचार सभा आजअखेर घेतल्या आहेत. मोदी यांनी ८८,३७0 किलोमीटर, राहुल यांनी ९३,0६६ किलोमीटर तर अमित शहा यांनी ६६,९0९ किलोमीटरचा प्रवास करून मतदारसंघ ढवळून काढले आहेत.
राहुल गांधी यांनी देशात ११ मार्च ते २६ एप्रिल यादरम्यान ७५ ठिकाणी प्रचार सभा घेतल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रात अवघ्या चार ठिकाणी सभा झाल्या आहेत. त्यांनी ३ एप्रिल रोजी पुणे, चंद्रपूर आणि वर्धा आणि २६ रोजी अहमदनगर येथे प्रचार सभा घेतल्या.
अमित शहा यांनी देशात २४ मार्च ते २३ एप्रिल दरम्यान ५0 ठिकाणी प्रचार सभा घेतल्या आहेत. यामध्ये पाच सभा त्यांनी महाराष्ट्रात घेतल्या आहेत. यामध्ये २९ मार्च रोजी औरंगाबाद, ९ एप्रिल रोजी नागपूर, १७ रोजी सांगली, १८ रोजी जालना,
१९ रोजी बारामती येथे त्यांच्या सभा झाल्या आहेत.
नरेंद्र मोदी यांनी देशात २0 मार्च ते २६ एप्रिल अखेर ७९ ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. त्यातील ८ सभा महाराष्ट्रात घेतल्या आहेत. यामध्ये १ एप्रिल रोजी वर्धा, ३ एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया, ६ रोजी नांदेड, ९ रोजी लातूर, १२ रोजी अहमदनगर, १७ रोजी माढा, २२ रोजी दिंडोरी आणि नंदुरबार येथे त्यांच्या प्रचारसभा झाल्या आहेत.