विकाराबाद : बंगालच्या उपसागरात आणि हिंदी महासागर क्षेत्रात शांतता राखणे हे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. या प्रयत्नात भारताच्या मित्र देशांचे सहकार्य आवश्यक आहे. असे न केल्यास सुरक्षा धोक्यात येईल. सागरी सुरक्षा हा सामूहिक प्रयत्न असून, “बाह्य शक्तींना” दारात आमंत्रण दिल्याने ऐक्याचे प्रयत्न मागे पडतील, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले.
विकाराबाद जिल्ह्यातील दामगुंडम जंगल परिसरात भारतीय नौदलाच्या व्हेरी लो फ्रिक्वेन्सी (व्हीएलएफ) रडार स्टेशनची पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. व्हीएलएफ नौदल स्टेशन जेव्हा कार्यान्वित होईल तेव्हा ते सागरी दलांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल. भारत सर्वांना एकत्र आणण्यावर विश्वास ठेवतो, तो कोणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे आम्ही मित्र शेजारी देशांना सोबत घेण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलत आहोत, असे ते म्हणाले.
दामगुंडमचे व्हीएलएफ रडार स्टेशन हे नौदलाचे दुसरे व्हीएलएफ कम्युनिकेशन ट्रान्समिशन स्टेशन आहे. तमिळनाडूमधील तिरुनेलवेली येथील आयएनएस कट्टाबोमन रडार स्टेशन हे अशा प्रकारचे पहिले आहे.