नवी दिल्ली: फेसबुकचा वापर करून भारतीय व्यक्तींच्या व्यक्तिगत माहितीची चोरी झाली असेल तर आम्ही ते कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिला. ते बुधवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. अमेरिकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये फेसबुक डेटा चोरी व लीक प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. कोट्यवधी युजर्सचा डेटा चोरुन आपल्या खासगी फायद्यासाठी विकण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये भारतीय युजर्सचीही गोपनीय माहिती असल्याचे समजते. याप्रकरणी भाजपाकडून काँग्रेसला जबाबदार धरण्यात आले आहे. काँग्रेसने केंब्रिज अॅनालॅटिका कंपनीला ही गोपनीय माहिती विकल्याचा आरोप भाजपाने केला आहे. या माहितीच्याआधारे नायजेरिया, केनिया, ब्राझील आणि भारतातील निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यात आल्याचा दिंडोरा कंपनीकडून पिटला जात आहे. त्यामुळे मार्क झुकरबर्ग यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी की, फेसबुकच्या माध्यमातून कोणत्याही भारतीय व्यक्तीची गोपनीय माहिती चोरीला गेली असेल तर ते कदापि खपवून घेतले जाणार नाही. देशाच्या माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार तुम्हाला समन्स बजावण्याचे आणि सक्त कारवाई करण्याचे अधिकार आम्हाला आहेत, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. खोट्या गोष्टींची पैदास करणाऱ्या भाजपाच्या कारखान्यातून आणखी एक खोटे उत्पादन बाहेर पडले आहे. खोटेपणा हा आता भाजपाच्या चारित्र्याचा भागच झाला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली.
मि. झुकरबर्ग आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही; रविशंकर प्रसाद यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 4:28 PM