ऑनलाइन लोकमत -
कोची, दि. १६ - मार्क झुकेरबर्गने ऑनलाईन सोशल नेटवर्किंगमध्ये क्रांती घडवली असेल. त्याने फेसबुकच्या सहाय्याने करोडो रुपये कमवले असतील. पण भारतातल्या एका तरुणाने अशी एक गोष्ट केली की ज्यामुळे मार्क झुकेरबर्गला स्वत: त्याच्याशी संपर्क साधून व्यवहार करावा लागला. अमल अगस्टाइन या तरुणाने एक डोमेन रजिस्टर केले होते जे मार्क झुकेरबर्गने विकत घेतले आहे.
मार्क झुकेरबर्गने मुलीचा जन्म झाल्यानंतर तिचे नाव मॅक्सिम चॅन झुकेरबर्ग असं ठेवलं होतं. त्यानंतर अमल अगस्टाइनने maxchanzuckerberg.org नावाने डोमेन रजिस्टर केले होते. फेसबुक टीमने अमल अगस्टाइनची माहिती काढत त्याच्याशी संपर्क साधला आणि या डोमेनची 700 डॉलरला खरेदी केली आहे. आपल्याशी फेसबुक व्यवहार करत आहे याची माहिती नसणा-या अमल अगस्टाइनने आनंद व्यक्त केला आहे. फेसबुकच्याच माध्यमातून त्याने ही माहिती दिली आहे.
'फेसबुकने माझ्याशी संपर्क साधला याचा मला खूप आनंद आहे. मला डोमेन रजिस्टर करण्याची खूप आवड आहे आणि यातूनच मला हा फायदा झाला आहे. मी याअगोदरही अनेक डोमेन रजिस्टर केले आहेत, गेल्या खूप काळापासून मी हे करत आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात मार्क झुकेरबर्गला मुलगी झाल्यानंतर मी हे डोमेन रजिस्टर केले होते', असं अमल अगस्टाइनने सांगितलं आहे. अमल अगस्टाइन सध्या इलेक्ट्रॉनिक्सच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे.
अमल अगस्टाइनला GoDaddy या मेल आयडीवरुन विनंती करणार मेल आला होता. ज्यामध्ये डोमेन विकण्यामध्ये तुम्हाला रस आहे का ? आणि त्याची किती किंमत घेणार ? असं विचारण्यात आलं होतं. अमल अगस्टाइन 700 डॉलरला विकण्याचा प्रस्ताव ठेवला होता. जो लगेच मान्य करण्यात आला. त्यानंतरच अमल अगस्टाइनला आपण फेसबुकसोबत व्यवहार करत आहोत असं कळलं.