महाराष्ट्रातील ‘त्या’ प्रकल्पांवर भाजपचे गुजरातमध्ये मार्केटिंग!रोजगार निर्मितीसाठी देताहेत वेदांता-फॉक्सकॉनचे उदाहरण
By कमलेश वानखेडे | Published: November 23, 2022 10:16 AM2022-11-23T10:16:44+5:302022-11-23T10:18:44+5:30
राजकोटमध्ये विकास या मुद्द्यावर भाजपची पकड घट्ट झाल्याचे दिसून येते. पण त्या विकासाचे वाटेकरी होऊ शकलो नाही, अशी नाराजी तरुण उघडपणे बोलून दाखवितात. नेमका हाच मुद्दा काँग्रेसने हेरला आहे.
राजकोट : बेरोजगारीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुजरातेत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला असताना दुसरीकडे भाजपने महाराष्ट्रातून गुजरातमध्ये आणलेल्या उद्योगांचे मार्केटिंग सुरू केले आहे. भाजपचे प्रचारक, पदाधिकारी व कार्यकर्ते वेदांता-फॉक्सकॉनसह टाटा समूहाच्या एअरबस प्रकल्पामुळे कशी रोजगारनिर्मिती होणार आहे, हे युवकांना पटवून देण्याच्या कामी लागले आहेत.
राजकोटमध्ये विकास या मुद्द्यावर भाजपची पकड घट्ट झाल्याचे दिसून येते. पण त्या विकासाचे वाटेकरी होऊ शकलो नाही, अशी नाराजी तरुण उघडपणे बोलून दाखवितात. नेमका हाच मुद्दा काँग्रेसने हेरला आहे. राहुल गांधी यांनी राजकोटच्या सभेत बेरोजगारी व बंद पडलेल्या छोट्या उद्योगांवर बोट ठेवत तरुणाईला साद घातली; तर आपनेही भाजपची नेमकी हीच दुखती नस दाबली आहे.
तरुण का आहेत नाराज?
लोकमत प्रतिनिधीने राजकोटच्या युवकांशी चर्चा केली असता बहुसंख्य युवक बेरोजगारीच्या मुद्द्यावर नाराज असल्याचे दिसून आले.
गेल्या काही वर्षांत शासकीय नोकरभरती झाली नाही. नोकरीसाठी अर्ज मागविले तर परीक्षा झाली नाही. परीक्षा घेतली तर पेपर फुटला. निकाल लागले तर मुलाखती झाल्या नाहीत. ज्यांच्या मुलाखती झाल्या त्यांना नियुक्तिपत्र मिळाले नाही.
तलाठ्यांच्या तीन हजारांवर जागा निघाल्या होत्या. त्यासाठी तीन लाखांवर अर्ज आले होते. यावरून सुशिक्षित बेरोजगारांची संख्या किती वाढली आहे, अशी आकडेवारी युवकच मांडत आहेत. सौराष्ट्रच्या भागात गेल्या पाच वर्षांत मोठा उद्योग उभारण्यात आलेला नाही. किमान त्यावर तरी भाजपने लक्ष द्यायला हवे होते, अशी तरुणांची अपेक्षा आहे.
नावात गांधी आहे तर गांधींचा विचार समजा : सुधांशू त्रिवेदी
- महात्मा गांधी यांनी स्वत:च्या वृत्तपत्रात वीर सावरकर यांच्यावर लेख लिहिला होता. त्यात त्यांनी सावरकरांबाबत बहादूर, चतुर व देशभक्त असा गौरव केला होता. त्यामुळे नावात गांधी असणाऱ्यांनी किमान गांधींनी लिहिलेले तरी वाचावे व त्यांचा विचार समजून घ्यावा, असा चिमटा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत राहुल गांधी व तुषार गांधी यांना काढला.
- त्रिवेदी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोटला एम्स, आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले. सहापदरी महामार्गाने जोडले. सरदार सरोवर प्रकल्प पूर्ण करून सौराष्ट्रची तहान भागवली. मात्र, २० वर्षे ज्यांनी तहानलेल्या गुजरातचे पाणी रोखून धरले, त्यांना सोबत घेऊन राहुल गांधी चालले. त्यामुळे आता गुजरातची जनताच काँग्रेसला ‘औकात’ दाखवेल, अशी टीकाही त्यांनी केली.