जयपूर : राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्णातील गजुना गावात दोन वर्षाच्या मुलीसह १२ वर्षाखालील चार मुलींचा एकाच मांडवात गुप्तपणे विवाह लावण्यात आला आहे. हा बाल विवाह रोखण्यासाठी पोलीस व सरकारी अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. या चार मुलींचे पतीदेखील अल्पवयीन आहेत.गेल्या २३ फेब्रुवारी रोजी मदन नाथ यांच्या कुटुंबात हा बालविवाह पार पडल्याची माहिती आहे. या बालविवाहाबाबतचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रात झळकल्यानंतर पोलीस जागे झाले आणि त्यांनी गुरुवारी रात्री गजुना गावाला भेट दिली. ‘आपली मेव्हणी आणि तिच्या भावांनी मिळून या चारही मुलींचा विवाह गुपचूप लावून दिला,’ असे मुलींचे काका कुपा रावल यांनी शुक्रवारी बालकल्याण कमिटीला सांगितले. राजस्थान राज्य बाल अधिकार संरक्षण आयोग आणि बालकल्याण कमिटी, भिलवाडाने भिलवाडाचे पोलीस अधीक्षक प्रदीप मोहन शर्मा यांना या संदर्भात पत्र लिहून मीडियातील बातमीच्या आधारावर या बालविवाहाला उपस्थित असणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची सूचना केली आहे. पोलीस या बालविवाहाच्या वृत्ताची स्वत:हून दखल घेऊन बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अन्वये एफआयआर दाखल करू शकतात, असे जोधपूर येथील कार्यकर्त्या कीर्ती भारती यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
राजस्थानात २ वर्षांच्या मुलीचा विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2016 1:31 AM