लग्न केल्याने पती मालक होत नाही; पत्नीचे स्वतःचे अधिकार अबाधित: अलाहाबाद हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 06:17 IST2025-01-06T06:17:04+5:302025-01-06T06:17:48+5:30
पत्नी ही पतीचा विस्तार नसून स्वतःचे हक्क आणि इच्छा असलेली व्यक्ती असल्याचेही व्यक्त केले मत

लग्न केल्याने पती मालक होत नाही; पत्नीचे स्वतःचे अधिकार अबाधित: अलाहाबाद हायकोर्ट
डॉ. खुशालचंद बाहेती
अलाहाबाद : पत्नीचे शरीर, गोपनीयता आणि अधिकार तिचे स्वतःचे आहेत, पतीच्या मालकीचे नाहीत, असे अलाहाबाद हायकोर्टाने म्हटले आहे. पतीने गुप्तपणे पत्नीबरोबरच्या एकांतातील कृत्यांचे व्हिडीओ बनवून फेसबुकवर टाकले आणि पत्नीच्या चुलत भावासोबत शेअर केल्याची तक्रार पत्नीने दिली. यावरून पतीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल झाला. तो रद्द करण्यासाठी पतीने हायकोर्टात धाव घेतली.
अलाहाबाद हायकोर्टात दाखल याचिकेनुसार पतीचे म्हणणे असे आहे की, तो तक्रारदाराचा कायदेशीर लग्न केलेला पती आहे. त्यामुळे यात कलम ६७ माहिती तंत्रज्ञान कायद्याचा गुन्हा घडलेला नाही. दुसरीकडे, पत्नीने युक्तिवाद केला की ती जरी पत्नी असली तरी तिचा अश्लील व्हिडीओ बनवण्याचा आणि शेअर करण्याचा पतीला अधिकार नाही.
पतीची याचिका फेटाळताना न्यायालय म्हणाले की, पतीने पत्नीचा विश्वास आणि निष्ठेचा आदर करणे अपेक्षित आहे. फेसबुकवर एकांतातील घटनांचे व्हिडीओ अपलोड करून, पतीने वैवाहिक संबंधांच्या पावित्र्याचे गंभीरपणे उल्लंघन केले आहे. पत्नीच्या संमतीशिवाय अंतरंग तपशील शेअर करणे हे विश्वासाचे आणि कायद्याचे उल्लंघन आहे.
काय म्हणाले न्यायालय?
- पत्नी ही पतीचा विस्तार नसून स्वतःचे हक्क आणि इच्छा असलेली व्यक्ती आहे. पत्नीच्या शारीरिक स्वायत्ततेचा आणि गोपनीयतेचा आदर करणे हे कायदेशीर बंधनच नाही, तर समान नातेसंबंधाची नैतिक अनिवार्यता आहे.
- पत्नीचे शरीर ही तिची स्वतःची मालमत्ता आहे. तिच्या वैयक्तिक आणि जिव्हाळ्याच्या सर्व पैलूंमध्ये तिची संमती सर्वतोपरी आहे. तसेच पती मालक नसून समान भागीदार आहे. गोपनीयता घटनेच्या परिच्छेद २१ अंतर्गत जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अंगभूत भाग आहे, असे न्यायमूर्ती विनोद दिवाकर यांनी नमूद केले.