भोपाळ: मध्य प्रदेशमधील गुना जिल्हा प्रशासनाने वेळीच कठोर कारवाई करून पाच वर्षाच्या मुलीचा एका अल्पवयीन मुलासोबत होऊ घातलेला विवाह रोखला आहे. गुणा जिल्ह्याच्या आरों मंडलातील तारपूर गावातील जात पंचायतीने ‘शिक्षा’ म्हणून या मुलीचे लग्न लावून देण्याचा आदेश दिला होता. या मुलीचे वडील जगदीश बंजारा यांनी त्यांच्या शेतात शिरलेल्या एका वासराला हाकलण्यासाठी त्याच्या दिशेने दगड भिरकावला. तो दगड वर्मी लागून ते वासरू मेले होते. वासरू ज्याचे होते त्याने जात पंचायतीकडे फिर्याद नेली.आदिवासी जमातीच्या या पंचायतीने जगदीश याने त्याच्या पाच वर्षांच्या मुलीचे लग्न लावून द्यावे, अशा शिक्षेचे फर्मान काढले.जगदीशने टाळाटाळ सुरु केल्यावर गावकऱ्यांनी त्याला गंगास्नान करून यायला लावले, मंदिरांमध्ये पूजा करायला लावल्या व गावजेवणही घालायला लावले. तरीही तो ऐकेना तेव्हा त्याने शिक्षा पूर्ण केल्याखेरीज त्याच्या इतर मुलींशी गावातील कोणीही मुलगा लग्न करणार नाही, अशी धमकी देण्यात आली. त्याच्या कुटुंबाला वाळित टाकण्यात आले. शेवटी विदिशा जिल्ह्यातील एका मुलाशी त्याने मुलीचे लग्न लावून द्यावे, असे फर्मान गाव पंचायतीने काढले. जगदीशची पत्नी पुष्पा हिने जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली आणि हा अघोरी शिक्षेचा प्रकार उघडकीस आला. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी नियाज अहमद खान यांनी सांगितले की, प्रशासनाने लगेच हस्तक्षेप करून मुला-मुलीचे वडील व पंचायत सदस्य यांच्याकडून प्रत्येकी २० हजार रुपयांचा बॉण्ड लिहून घेतला व त्याचे उल्लंघन करून लग्न लावले गेले तर सर्वांना तुरुंगात टाकण्याची ताकीद दिली. जगदीशच्या कुटुंबावरील बहिष्कार सुरु ठेवला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी तंबी गावकऱ्यांनाही देण्यात आली. गावातील आंगणवाणी सेविका आणि स्थानिक पोलिसांनाही गावातील हालचालींकडे लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
पाच वर्षाच्या मुलीचे ‘शिक्षा’ म्हणून होणारे लग्न आईने रोखले
By admin | Published: April 17, 2017 2:03 AM