नवी दिल्ली : पाऊस पडावा, यासाठी लोक काय करीत नाहीत? कुठे पूजाअर्चा होते, तर कुठे यज्ञ केले जातात. काही ठिकाणी तर बेडकांचे लग्न लावले जाते. मात्र, बंगळुरूच्या ग्रामीण भागात वरुणराजाचे आगमन व्हावे यासाठी मुलांचे एकमेकांशी लग्न लावतात. वरुणराजाची करुणा भाकण्यासाठी लावण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या विवाहात एका मुलाने वराचा पोशाख घातला होता, तर दुसरा मुलगा वधूच्या वेशात होता. मग त्यांचे लग्न लावण्यात आले. हा विवाह पुरेसा पाऊस पडावा म्हणून करण्यात आलेल्या पूजेचा एक भाग आहे. या विवाहामुळे संपूर्ण भागात पाऊस पडून भरपूर धनधान्य पिकेल, असे गावकरी मानतात. या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आयोजन करण्यात आले. मंदिरात हा विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी अनेक लोक उपस्थित होते. विवाहासाठी गावात वर्गणी गोळा करण्यात आली. त्यानंतर विवाह सोहळ्याचे आयोजन झाले. त्याचबरोबर लोकांना या विवाहाचे निमंत्रण देण्यात आले. स्थानिक लोक या विवाहाला आपल्या परंपरेचा भाग मानतात. मुलांचे लग्न ही येथील ‘हाराके’ परंपरा असून, संपूर्ण भागात संपन्नता आणि समृद्धी यावी यासाठी या पूजेचे आयोजन केले जाते. या पूजेसाठी दोन मुलांची निवड करून नंतर त्यांचे लग्न लावले जाते, असे एका ग्रामस्थाने सांगितले.
पावसासाठी दोन मुलांचे लावले जाते लग्न
By admin | Published: March 06, 2017 4:48 AM