बिहारमधील गया येथील एका खासगी रुग्णालयात एक अनोखं लग्न पाहायला मिळालं. अनेकदा तुम्ही फक्त चित्रपटांमध्येच हा प्रकार पाहिला असेल, पण गयामध्ये खऱ्या आयुष्यातही घटना घडली. रुग्णालयात एका आजारी आईने शेवटच्या क्षणी आपल्या लेकीचे लग्न लगेचच करण्याची अट कुटुंबियांसमोर ठेवली. यानंतर हॉस्पिटलच्या आयसीयूमध्येच आईसमोरच विवाह झाला. रविवारी दोन तासांनंतर महिलेचा मृत्यू झाला.
आशा सिंह मोड मॅजिस्ट्रेट कॉलनीजवळील अर्श हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल असलेल्या पूनम कुमारी वर्मा यांनी आपली मुलगी चांदनी हिने त्या जिवंत असतानाच लग्न करावं अशी अट आपल्या कुटुंबीयांसमोर ठेवली. पूनम कुमारी वर्मा अनेक दिवसांपासून आजारी होत्या. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला अर्श रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगताना कधीही मृत्यू होऊ शकतो, असे सांगितले.
दाखल झालेल्या रुग्ण पूनम कुमारी वर्मा या ललन कुमार यांच्या पत्नी आहेत, जे जिल्ह्यातील गुरु ब्लॉकमधील बाली गावातील रहिवासी आहे. पूनम कुमारी वर्माच्या नातेवाईकांनी सांगितले की, चांदनी कुमारी हिचा 26 डिसेंबर रोजी सुमित गौरव याच्याशी लग्न झालं. मुलीच्या आईच्या आग्रहास्तव दोघांनी लग्नाच्या ठरलेल्या तारखेच्या एक दिवस आधी लग्न केले. लग्नानंतर अवघ्या दोन तासांतच मुलीच्या आईचे निधन झाले. यानंतर सर्वांचे डोळे पाणावले.
पूनम कुमारी वर्मा मगध मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एएनएम म्हणून कार्यरत होत्या आणि कोरोनाच्या काळापासून सतत आजारी होत्या. त्यांना हृदयविकाराचा त्रास होता. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये मुलीचं लग्न झाले. या घटनेने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आले. कुटुंबीयांवर सुखासोबतच दु:खाचा डोंगरही कोसळला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.