पानिपत : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत समलिंगी विवाहाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले. विवाह केवळ भिन्न लिंगाच्या लोकांमध्येच होऊ शकतो, असे ते म्हणाले.
१२ मार्चपासून सुरू झालेल्या तीनदिवसीय बैठकीच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी होसाबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीला तीनही दिवस भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. समलिंगी विवाहाशी संबंधित प्रश्नावर होसाबळे म्हणाले, ‘भारतीय संस्कृतीत विवाह हा एक संस्कार आहे. दोन व्यक्तींच्या आनंदासाठी हा करार नाही. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सरकार्यवाह होसाबळे यांनी सांगितले. संघाच्या बैठकीतही राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही.
राहुल गांधींनी जबाबदारीने बोलावे
राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावरही सरकार्यवाह होसाबळे यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘राहुल गांधींचा राजकीय अजेंडा असल्याने यावर भाष्य करण्याची गरज नाही. आरएसएसचे सत्य सर्वांनाच माहीत आहे. तरीही प्रमुख विरोधी पक्षाचे मोठे नेते असल्याने राहुल गांधी यांनी अधिक जबाबदारीने बोलले पाहिजे.’
मीही आणीबाणीच्या काळात तुरुंगात
ते म्हणाले, ‘मीही आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलो होतो. इंदिरा, राजीव, सोनिया गांधी यांच्यानंतर आता राहुल गांधीही संघाबद्दल वक्तव्य करत आहेत. लोकशाही धोक्यात आल्याचे ते सांगत आहेत. लोकशाहीबद्दल बोलण्यासाठी काँग्रेसकडे नैतिक अधिकार नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"