नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय एमएमए (मिक्स मार्शल आर्ट्स) खेळाडू आणि दंगल गर्ल्सची धाकटी बहील रितू फोगाट हिचा ८ नोव्हेंबर रोजी विवाह होणार आहे. सोनिपत येथील सचिन छिक्कारा याच्याशी त्यांचा विवाह होणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या विवाह सोहळ्यात रितू फोगाट सप्तपदी नाही तर अष्टपदी घेणार आहे. मुली वाचवण्याच्या वचनासह ही आठवी फेरी घेतली जाणार आहेत. तसेच या विवाहात कुठलाही हुंडा दिला घेतला जाणार नाही. तर एक रुपया आणि नारळाचा शगून देऊन हा विवाह होईल.
महावीर फोगाट यांच्या चार मुलींपैकी गीता, बबिता आणि संगीता यांचे विवाह आधीच झाले आहेत. आता त्यांची धाकटी बहीण रितू फोगाट हिच्या विवाहाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. फोगाट परिवार हा विवाह पारंपरिक पद्धतीने आणि साधेपणाने करणार आहे. तसेच इतर मुलींच्या लग्नांप्रमाणेच रितू फोगाट हिच्या विवाहातही शगून म्हणून एक नारळ आणि एक रुपया दिला जाईल.
हा विवाह सोहळा गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या महावीर फोगाट अकादमीमध्ये साधेपणाने संपन्न होईल. गीता, बबिता आणि संगिता यांनीही त्यांच्या विवाहामध्ये मुली वाचवण्याचे वचन घेत आठवी फेरी घेतली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत रितू फोगाटही मुली वाचवण्याच्या वचनासह आठवी फेरी घेणार आहे.
रितू फोगाट राष्ट्रकुलमधील सुवर्णपदक विजेती आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप अंडर २३ मधील रौप्यपदक विजेती आहे. तिने २०१९ मध्ये कुस्ती सोडून एमएमए जॉईन केले होते. ती वन चॅम्पियनशिपमध्ये २० सामने जिंकली आहे. एमएमए जॉईन करणारी ती देशातील पहिली महिला खेळाडू आहे.
या विवाहाबाबत महावीर फोगाट यांनी सांगितले की, रितूचा विवाह साधेपणाने आणि हिंदू रीतिरिवाजानुसार होणार आहे. यामध्ये पैलवानंसाठी देशी तुपातील हलवा आणि खीर-चुरमा असे पदार्थ ठेवले जातील.