arjun meghwal | नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारने नऊ वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीमने एक मोठा निर्णय घेत कॅबिनेटमध्ये मोठा बदल केला. मागील काही दिवसांपासून न्यायव्यवस्था, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे किरेन रिजिजू यांचे कायदा मंत्रिपद काढून घेण्यात आले आहे. त्यांच्याजागी अर्जुन राम मेघवाल यांची मंत्री पदावर वर्णी लागली. IAS बनून आपल्या कारकिर्दीची सुरूवात करणारे मेघवाल आता नवे कायदा मंत्री असणार आहेत.
IAS बनून केली सुरूवातनवे कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांची १९८२ मध्ये आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली होती. यानंतर त्यांनी राजस्थानमध्ये आपली सेवा बजावली. काही कालावधीनंतर मेघवाल यांना जिल्हा दंडाधिकारी बनवण्यात आले. खरं तर मेघवाल यांनी कायदा आणि मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे (MBA) देखील शिक्षण घेतले आहे.
दरम्यान, २०१५ मध्ये अर्जुन राम मेघवाल हे लोकसभेत भाजपचे चीफ व्हिप होते. मेघवाल हे सायकलवरून संसदेत जात असत. राजस्थानी पगडी आणि कुर्ता परिधान करून सायकलवरून संसदेत जाणाऱ्या भाजप नेत्याच्या साधेपणाचे खूप कौतुक व्हायचे. मेघवाल २००९ साली राजस्थानच्या बिकानेरमधून निवडून आले. पाच वर्षानंतरही ते पुन्हा एकदा निवडून आले. निवृत्त आयएएस अधिकारी मेघवाल हे पंतप्रधान मोदींचे जवळचे सहकारी मानले जातात.
वयाच्या १५व्या वर्षी लग्नआपल्या साधेपणामुळे प्रसिद्ध असलेल्या अर्जुन राम मेघवाल यांचा जन्म राजस्थानमधील एका गरीब कुटुंबात झाला. मेघवाल यांनी बिकानेरच्या डुंगर कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. एमबीए व्यतिरिक्त मेघवाल यांनी राज्यशास्त्रात मास्टर्स केले आहे. १९५३ मध्ये जन्मलेल्या मेघवाल यांचे वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी लग्न झाले होते. संसदीय कामकाज मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, अर्जुन राम मेघवाल यांचा विवाह पन्ना देवी यांच्याशी १९६८ मध्ये झाला होता.