विशाखापट्टणम: चित्रपटांमध्ये अनेकदा लव्ह ट्रायअँगल दाखवला जातो. यात कधी-कधी अनपेक्षित ट्विस्ट असतात. असाच काहीसा प्रकार आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये घडला आहे. विशाखापट्टणमच्या समुद्रकिनाऱ्यावरुन एक विवाहित महिला वाहून गेल्याची माहिती समोर आली होती, पण नंतर समजले की, महिला समुद्रात वाहून गेली नसून, आपल्या प्रियकराकडे पळून गेली आहे. जाणून घ्या नेमकं काय प्रकरण आहे...
अचानक झाली बेपत्तासविस्तर माहिती अशी की, साई प्रिया नावाची महिला सोमवारी सायंकाळी तिचा पती श्रीनिवाससोबत लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आरके बीचवर आली होती. श्रीनिवास समुद्रकिनारी बसला होता, तर साईप्रिया लाटांजवळ गेली आणि बेपत्ता झाली. श्रीनिवासला वाटले की, ती समुद्राच्या लाटांसोबत पाण्यात वाहून गेली असावी. यानंतर श्रीनिवासने पत्नी पाण्यात बुडल्याची तक्रार दाखल केली. दोन दिवस तिचा शोध घेण्यात आला, मात्र ती काही हाती लागली नाही.
मेसेज आला- 'मला शोधू नको, मी...'शहरातील थ्री टाऊन पोलिस स्टेशनचे निरीक्षक रामा राव यांनी सांगितले की, बुधवारी साईप्रियाच्या कुटुंबीयांना व्हॉट्सअॅपवर साई प्रियाचा व्हॉईस मेसेज आला. "मी साईप्रिया बोलतेय, मी जिवंत आहे आणि बंगळुरूला रवी(बॉयफ्रेंड)कडे आली आहे. आम्ही दोघे एकमेकांवर खूप दिवसांपासून प्रेम करतो आणि लग्न करणार आहोत. माझी काळजी करू नका, शोधण्याचा प्रयत्न करू नका. मी खूप थकले आहे, तुम्ही दबाव टाकला तर मी बरं वाईट करुन घेऊन. मला पोलिस आणि प्रशासनाची माफी मागायची आहे. रवीच्या कुटुंबाला त्रास देऊ नका,'' असा मेसेज पाठवून साईप्रिया प्रियकराकडे निघून गेली.
शोध मोहिमेत 1 कोटीचा खर्चहा मेसेज मिळाल्यानंतर पोलिसांनी साईप्रियाची लोकेशन ट्रेस केली. तिची लोकेशन बंगळुरूमध्ये असल्याचे समोर आले. श्रीनिवास आणि साईप्रिया यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण, लग्न झाल्यापासून दोघेही आनंदी नव्हते. साईप्रिया आधीपासून रवीवर प्रेम करायची आणि घरच्यांनी तिच्या मनाविरोधात श्रीनिवाससोबत लग्न केले होते. तिकडे साई आणि रवीचे सुख जुळले असले तरी, पोलिसांना मोठा फटका बसला आहे. कारण, या सर्व शोध मोहिमेवर प्रशासनाने सुमारे 1 कोटी रुपये खर्च केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.