ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 2 - केवळ लग्न न झालेल्या महिलाच सामाजिक कल्याण निवासी महिला पदवी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पात्र आहेत असं तेलंगणा सरकारने म्हटलं आहे. विवाहीत महिला विद्यार्थ्यांचं अभ्यासातून लक्ष विचलीत करतात असा तर्क सरकारने लावला आहे. एक वर्षासाठी असा नियम काढण्यात आला आहे.
तेलंगणा सोशल वेलफेअर रेजिडेंशिअल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स सोसायटी द्वारा एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. यामध्ये 2017-18 या वर्षात बीए/बीकॉम/बीएससी-फर्स्ट ईअरसाठी महिला (केवळ अविवाहीत महिला) अर्ज करू शकतात असं म्हटलं आहे. या निर्णयावर तेलंगणामध्ये मोठा विरोध होत आहे . सध्या सामाजिक कल्याण निवासी महिला पदवी महाविद्यालयातील पहिल्या वर्षात जवळपास 4000 महिला शिक्षण घेत आहेत. सामाजिक संघटनांनी या नियमाचा विरोध केला आहे. विवाहीत महिलांना शिक्षण घेण्यापासून कोणी कसं रोखू शकतं असा सवाल उपस्थित करत महिला संघटनांनी याचा कडाडून विरोध केला आहे.
लग्न झालेल्या महिलांचे पती त्यांना आठवड्यात किमान एक-दोनदा भेटायला येतील त्यामुळे अभ्यासातून लक्ष विचलीत होऊ शकतं म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं तेलंगणा सोशल वेलफेअर रेजिडेंशिअल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स सोसायटीचे व्यंकट राजू यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.