सियाचीन आगीच्या घटनेत शहीद झालेल्या कॅप्टन अंशुमन यांच्या आई-वडिलांनी आपल्या सुनेवर गंभीर आरोप केले आहेत. आई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या हौतात्म्यानंतर त्यांची सून (स्मृती सिंह) हिने मुलाचं एटीएम कार्ड, जे त्याने आईला वापरण्यासाठी दिलं होतं ते ब्लॉक केलं आहे. तसेच कुटुंब वापरत असलेलं पोस्टपेड सिमही प्रीपेडमध्ये बदलण्यात आलं. कॅप्टन अंशुमन यांच्या आईने दावा केला आहे की, तिने आपल्या सुनेला कधी भांडी देखील घासायला दिली नाही, जेणेकरून तिचे हात खराब होऊ नये.
अंशुमन यांच्या वडिलांनी 'आज तक'शी बोलताना सांगितलं की, "संपूर्ण कुटुंबाकडे अंशुमनच्या नावावर एक सिम होतं जे पोस्टपेड होतं. सुनेने कुटुंबातील सदस्यांना बेसिक सिम काढून टाकलं आणि ते पोस्टपेडवरून प्रीपेडमध्ये बदललं. आम्ही कंपनीला फोन केला असता आम्हाला ते बंद झाल्याचं कळलं. तेव्हाही आम्ही विचार केला, हरकत नाही. यानंतर, माझी पत्नी वापरत असलेलं एटीएम देखील आठ तारखेला ब्लॉक करण्यात आलं. हे एटीएम अंशुमनच्या बँक अकाऊंटचं होतं. त्याने ते आधीच आईला दिलं होतं."
वडिलांनी पुढे सांगितले की, अंशुमन सिंह याचं त्याच्या आईसोबत इतकं अनमोल नातं होतं की समाजात असं उदाहरण सापडणार नाही. संपूर्ण कुटुंबाशी त्याचं घट्ट नातं होतं. घरी आल्यावर त्याला आईच्याच हातचं जेवण लागायचं. जेव्हा मी सुनेच्या वडिलांना विचारलं, आमच्याकडून काय चूक झाली ते मला सांगा? तर यावर ते म्हणाले की, आम्हाला आमचं मागील आयुष्य विसरायचं आहे. त्यावर आम्ही उत्तर दिलं की आमच्यासाठी तो जीवनाचा एक भाग आहे, तुमच्यासाठी तो भूतकाळ असेल पण आमच्यासाठी वर्तमान आणि भविष्य तोच आहे.
अंशुमन यांच्या आईने टीव्ही 9 भारतवर्षशी बोलताना सांगितलं की, मी माझ्या सुनेला कधीही भांडीही घासायला सांगितली नाहीत. मी चार महिने नोएडामध्ये राहिले, तिथे मी तिला सांगत असे की तू भांडी नको घासू, तुझे हात खराब होतील. लग्नाआधी जेव्हा मुलगा मला सुनेबद्दल सांगायचा तेव्हा मी त्याला म्हणायचे की, ही खूप गोड आहे. त्यावेळी मी खूप आनंदी होती. मी स्वत: आपल्या सुनेला स्वयंपाक करून खायला देईन असं ही म्हटलं होतं.