शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांची पत्नी स्मृती सिंह यांचा व्हिडीओ पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. कॅप्टन अंशुमन यांना राष्ट्रपतींच्या हस्ते कीर्ती चक्र (मरणोत्तर) प्रदान करण्यात आलं. सियाचीन ग्लेशियर येथे १९ जुलै रोजी लागलेल्या आगीच्या घटनेत कॅप्टन शहीद झाले होते. पत्नी स्मृती सिंह म्हणाल्या की, "गेल्या वर्षी १८ जुलैच्या रात्री आपल्या पतीशी खूप वेळ संभाषण केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी कॅप्टन अंशुमन सिंह हे शहीद झाल्याची माहिती समजली."
"पहिल्याच नजरेत आम्ही प्रेमात पडलो होतो. १८ जुलैच्या रात्री आम्ही आमच्या भविष्याबाबत चर्चा केली होती, ज्यामध्ये घर आणि मुलं याबाबत बराच वेळ चर्चा झाली होती, पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते शहीद झाले असल्याचा फोन आला. आमची कॉलेजमध्ये पहिली भेट झाली आणि पहिल्या नजरेत प्रेमात पडलो होतो. ते अतिशय हुशार होते."
"फक्त एक महिन्याच्या भेटीनंतर आमचं आठ वर्षांचं लाँग डिस्टन्स रिलेशनशिप होतं. त्यानंतर आम्हाला वाटलं की आता आपण लग्न करावं आणि आम्ही तसंच केलं. पुढच्या ५० वर्षांत आपलं जीवन कसं असेल याबद्दल १८ जुलै रोजी आमच्यात दीर्घ संवाद झाला. आम्ही घर, मुलं आणि बरंच काही बोललो. १९ तारखेला सकाळी उठल्यावर मला फोन आला की ते आता नाहीत."
स्मृती पुढे म्हणाल्या की, "पहिले सात ते आठ तास आम्हाला विश्वासच बसत नव्हता की ते आता नाहीत. आत्तापर्यंत मी हे स्वीकारू शकलेले नाही. हे सत्य नसावं याचाच मी विचार करते. पण आता माझ्या हातात कीर्तीचक्र आहे तेव्हा मला हे सत्य असल्याची जाणीव झाली आहे. ते हिरो आहेत. आपण आपलं आयुष्य थोडेसं सांभाळू शकतो, कारण त्यांनी खूप काही सांभाळलं आहे."
"इतर लष्करी कुटुंबांना वाचवण्यासाठी त्यांनी बलिदान दिलं." कॅप्टन अंशुमन सिंह सियाचीनमध्ये तैनात होते. याच दरम्यान, जुलै २०२३ मध्ये शॉर्ट सर्किटमुळे भारतीय लष्कराच्या दारूगोळा भंडारमध्ये आग लागली होती. कॅप्टन यांनी धाडस दाखवत फायबर ग्लासच्या झोपडीत अडकलेल्या आपल्या सहकारी सैनिकांचे प्राण वाचवले. मात्र, याच दरम्यान ते आतच अडकले आणि शहीद झाले.