नवी दिल्ली - गतवर्षी जून महिन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारताच्या कर्नल संतोष बाबूंसह २० जणांना वीरमरण आले होते. मात्र धारातीर्थी पडण्यापूर्वी या वीर जवानांनी चीनचा भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला होता. दरम्यान, भारतभूमीच्या रक्षणासाठी या जवानांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आला आहे. कर्नल संतोष बाबू यांना महावीर चक्र, तर इतर पाच जवानांना वीरता पदक जाहीर करण्यात आले आहे.कर्नल संतोष बाबूंना त्यांच्या शौर्यासाठी मरणोपरांत महावीर चक्र जाहीर झाले आहे. तर नायब सुभेदार नुडूराम सोरेन, हवालदार के. पिलानी, हवालदार तेजेंद्र सिंह, नायक दीपक सिंह आणि शिपाई गुरतेज सिंह यांना वीरता पदक जाहीर झाले आहे. तर हुतात्मा मेजर अनुज सूद यांना काश्मीर खोऱ्यातील उत्कृष्ट कामासाठी शौर्य चक्र जाहीर झाले आहे.लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावाची परिस्थिती असताना चिनी सैन्याकडून घुसखोरी हाणून पाडण्याच्या मोहिमेवर कर्न संतोष बाबू आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सहकारी निघाले होते. त्यावेळी गलवान खोऱ्यात तुंबळ चकमक होऊन भारताचे २० जवान धारातीर्थी पडले होते. तर भारतीय जवानांनी चीनच्या ४० हून अधिक सैनिकांना ठार केले होते.
गलवानमधील हुतात्मा कर्नल संतोष बाबूंना महावीर चक्र, इतर पाच जवानांचाही सन्मान
By बाळकृष्ण परब | Published: January 25, 2021 11:02 PM