नवी दिल्ली : कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या निमलष्करी दलाच्या सर्व जवानांना शहीद मानले जाते, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी मंगळवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात नमूद केले. गेल्या चार वर्षांत देशाच्या विविध भागांतील दंगली हाताळताना निमलष्करी दलाचा एकही जवान मृत्युमुखी पडला नाही, असेही ते म्हणाले. २०१४ ते २१ मार्च २०१७ यादरम्यान ३,४३६ निमलष्करी जवान जखमी झाले. तथापि, २०१३-१५ दरम्यान दंगलखोरांना काबूत आणताना १२ पोलीस कर्मचारी ठार, तर ४,७८० जखमी झाले. निमलष्करी जवानांना सुरक्षा साधने, आधुनिक शस्त्रे आणि दारूगोळा पुरविण्यात येतो, असेही सांगून ते म्हणाले की, पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी व्यूहात्मक प्राधान्य व संचालनात्मक गरजांनुसार सुरक्षा साधने तसेच उपकरणे घेण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक साह्य पुरविते. त्यातून चिलखत, बुलेटप्रूफ जाकीट, बुलेटप्रूफ हेल्मट या साहित्याची खरेदी केली जाते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कर्तव्य बजावताना मृत झालेले शहीदच
By admin | Published: March 29, 2017 1:38 AM