रायपूर - छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यामध्ये एका शहीद स्वातंत्र्यसैनिकावर त्यांच्या हौतात्मानंतर सुमारे १०९ वर्षांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. सन १९१३ मध्ये ब्रिटिश सरकारच्या काळात बलरामपूर जिल्ह्यातील लाकुंड नकेशिया या शेतकऱ्याला हौतात्म्य प्राप्त झाले होते. नकेशिया समाजातील नागरिक बऱ्याच काळापासून त्यांच्या अस्थी देण्याची मागणी करत होते. लाकुंड यांना हौतात्म्य प्राप्त झाल्यावर त्यांच्या अस्थी इंग्रजांनी सरगुजा येथील एका सरकारी शाळेत ठेवण्यात आल्या होत्या. आदिवासींना याचा माहिती मिळाल्यावर त्यांनी स्थानिक आमदार आणि संसदीय सचिव चिंतामणी महाराज आणि अन्य लोकप्रतिनिधींकडे अस्थी परत देण्याची मागणी केली होती.
सरकारी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हुतात्मा स्वातंत्र्यसैनिकाच्या अस्थी समाजातील लोकांकडे सुपुर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ४ फेब्रुवारी २०२२ रोजी संसदीय सचिव चिंतामणी महाराज, माजी राज्यसभा सदस्य नंदकुमार साय, जिल्हा पंचायत सदस्य अंकुश सिंह खैरवार नगेशिया समाजासह स्थानिक लोकप्रतिनिधी अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सामरी पाठ येथे त्यांच्यावर हौतात्मानंतर १०९ वर्षांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.
आदिवासी नगेशिया शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार इंग्रजांच्या शासनकाळामध्ये लाकुंड नगेशिया यांची इंग्रज सैनिकांनी हत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या अस्थी सरगुजा येथील एका शाळेमध्ये ठेवल्या होत्या. समाजातील लोकांनी सांगितले की, ते इंग्रजांविरोधातील असहकार आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. सामरी पाठ येथे दुष्काळ पडला होता. मात्र तरीही इंग्रजांनी कर आकारणे बंद केले नव्हते. त्याविरोधात लाकूंड यांनी आवाज उठवला होता. त्यामुळे इंग्रजांनी त्यांची हत्या केली होती.