जम्मू : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाला काही दिवस शिल्लक असतानाच जम्मूच्या राजौरी जिल्ह्यातील एका लष्करी छावणीवर दोन दहशतवाद्यांनी बुधवारी रात्री उशिरा आत्मघाती हल्ला केला. यात तीन जवान शहीद झाले. यावेळी उडालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही चकमक चार तास चालली, अशी माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही आत्मघाती हल्लेखोर जैश ए मोहंमद संघटनेचे असल्याची शक्यता आहे. त्यांनी छावणीत घुसण्याचा प्रयत्न केला. सतर्क सुरक्षा जवानांनी त्यांना कंठस्नान घातले.
परघाल येथील लष्करी छावणी दहशतवाद्यांचे लक्ष्य होती. छावणीच्या पहारेकरी सैनिकांना काही लोक खराब हवामान व झाडीच्या दाट पर्णसंभाराचा गैरफायदा घेत चौकीकडे येत असल्याचे दिसले, असे लष्कराचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले. सतर्क पहारेकरी सैनिकांनी या दहशतवाद्यांना आव्हान दिले. छावणीत घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. सतर्क जवानांनी तत्काळ नाकेबंदी करून त्यांना वेढा घातल्यानंतर चकमक उडाली. जवानांनी दोन्ही आत्मघाती हल्लेखोरांना कंठस्नान घातले. तथापि, आत्मघाती हल्ला परतवून लावताना सहा जवान जखमी झाले आणि त्यातील तिघांचा नंतर मृत्यू झाला, असे ले. कर्नल आनंद म्हणाले.
आत्मघाती हल्ल्यांचे पुनरागमन
पराघल येथील हल्ला जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात तीन वर्षांच्या खंडानंतर आत्मघाती हल्ल्याचे पुनरागमन झाल्याचे निदर्शक आहे. यापूर्वी शेवटचा आत्मघाती हल्ला १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा जिल्ह्यातील लेथरपुरा येथे झाला होता. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर खोऱ्यात एकही आत्मघाती हल्ला झाला नव्हता.
गुप्तचर माहितीमुळे सुरक्षा दले होती सतर्क
राजौरी भागात दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती गुप्तचरांकडून मिळाल्यानंतर सुरक्षा दले व पोलिसांना सतर्क करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची दरहाल व नौशेरा भागात शोधमोहीम सुरू आहे. तत्पूर्वी २२ एप्रिल रोजी पंतप्रधान जम्मूला येणार होते. तेव्हाही जैश ए मोहंमदच्या दहशतवाद्यांनी जम्मूत आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न केला होता.
शूरवीरांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. भारतीय लष्कर त्यांना सलाम करते. त्यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी व कर्तव्यनिष्ठेसाठी राष्ट्र त्यांचे सदैव ऋणी राहील.- ले. कर्नल आनंद