नवी दिल्ली: दहशतवाद्यांनी अपहरण करुन हत्या केलेले राष्ट्रीय रायफल्सचे जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झालं आहे. औरंगबेज यांच्या शौर्याचा आणि त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा शौर्य चक्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला याबद्दलची घोषणा झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये औरंगजेब यांना वीरमरण आलं होतं. याच वर्षी 15 जूनला ईद साजरी करण्यासाठी घरी जात असलेल्या औरंगजेब यांचं दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं. यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. दहशतवाद्यांनी झाडलेल्या गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न झालेला त्यांचा मृतदेह पुलवामा जिल्ह्यातील गुस्सू भागात सापडला होता. ईद साजरी करण्यासाठी सुट्टी घेतलेल्या औरंगजेब यांनी घरी जाण्यासाठी लष्करी तळावरुन टॅक्सी पकडली होती. ते दक्षिण काश्मीरच्या शोपियानचे रहिवासी होते.
Independence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 6:44 PM