नवी दिल्ली - देशाच्या संरक्षणासाठी चीनच्या सैन्यासोबत लढताना नायक दीपक सिंह हे गलवाना खोऱ्यात २०२० मध्ये चकमकीत शहीद झाले होते. पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पत्नी रेखा सिंह यांनी आता लढाईच्या मैदानात पाऊल ठेवले आहे. भारतीय लष्करात रेखा सिंह अधिकारी म्हणून दाखल झाल्या.
पती शहीद झाल्याचे डोंगराएवढे दु:ख बाजूला सारून ही महिला नव्याने आयुष्याची लढाई लढण्यासाठी सज्ज झाली आहे. लेफ्टनंट रेखा सिंह (२९) यांना शनिवारी लष्करात अधिकारी म्हणून नियुक्ती दिली. चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये तैनात केले आहे. लेफ्टनंट रेखा सिंह यांना पूर्व लडाखमधील फ्रंटलाइन युनिटमध्ये नियुक्ती दिली आहे. रेखा यांचे पती दीपक सिंग हे आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये होते.
चकमकीत जखमी झालेल्या सैनिकांना वैद्यकीय मदतीवेळी धाडस दाखविल्याबद्दल २०२१ मध्ये नायक दीपक सिंग यांना मरणोत्तर वीरचक्र प्रदान करण्यात आले. ३० हून अधिक भारतीय सैनिकांचे प्राण वाचविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. १५ जून २०२० रोजी पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात चकमकीमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते.
पाच महिला अधिकाऱ्यांची तुकडी दाखलभारतीय लष्कराने प्रथमच आपल्या तोफखाना (आर्टिलरी) रेजिमेंटमध्ये पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश केला आहे. या महिला अधिकाऱ्यांनी चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले आहे. लेफ्टनंट महक सैनी, लेफ्टनंट साक्षी दुबे, लेफ्टनंट अदिती यादव आणि लेफ्टनंट पायस मुद्गिल यांच्यासह पाच महिला अधिकाऱ्यांची तुकडी सहभागी झाली आहे. यातील तीन अधिकारी चीनच्या सीमेवर आणि इतर दोन पाकिस्तानच्या सीमेजवळ तैनात असणार आहेत. जानेवारीमध्ये लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी महिला अधिकाऱ्यांना आर्टिलरी युनिटमध्ये नियुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला होता.