जम्मू-काश्मीर : नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात महाष्ट्रातील परभणीमधील एक जवान शहीद झाला असून आणखी चार जवान जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिह्यातील कृष्णाघाटी येथील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एका ऑफिसरसह तीन जवान जखमी झाले आहेत. तर महाष्ट्रातील परभणीतील पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचे शिपाई शुभम मुस्तापूरे शहीद झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडून देखील चोख प्रतिउत्तर दिले जात आहे.
दरम्यान, सोमवारी दक्षिण काश्मिरात तीन ठिकाणी अतिरेक्यांविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत 13 अतिरेक्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले. या चकमकीत तीन जवान शहीद झाले असून, चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी सांगितले की, काश्मीर खोऱ्यात सक्रीय अतिरेक्यांविरुद्ध हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा प्रतिहल्ला आहे. सुरक्षा दलाने केलेल्या या हल्ल्याने हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबा यांना मोठा झटका बसला आहे.अधिका-यांनी सांगितले की, शोपियांच्या काचदुरू भागात झालेल्या चकमकीत सैन्याचे तीन जवान शहीद झाले. या ठिकाणाहून अतिरेक्यांचे तीन मृतदेह मिळाले आहेत. काचदुरू येथील मोहीम संपलेली आहे. सुरक्षा दल उद्या पुन्हा येथे तपास मोहीम राबविणार आहे. पोलीस महासंचालकांनी एका वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या प्रयत्नांचाही या वेळी उल्लेख केला. दायलगाम चकमकीच्या वेळी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी एका अतिरेक्याच्या नातेवाइकांना फोन केला. ते त्यांच्याशी ३० मिनिटे बोलले. जेणेकरून, या अतिरेक्याला आत्मसमर्पण करण्यासाठी तयार केले जावे. मात्र, या अतिरेक्याने आपल्या कुटुंबीयांचे म्हणणे ऐकले नाही. या अतिरेक्याने पोलिसांच्या दिशेने फायरिंग केली. त्यानंतर, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हा अतिरेकी मारला गेला, तर अन्य एक जण जिवंत पकडला गेला.