गुरूग्राम- गुरूवारी सकाळी मानेसरमधील मारूती सुझुकीच्या फॅक्टरीमध्ये बिबट्या शिरला होता. फॅक्टरीच्या इंजिन रूमजवळ असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या टीमकडून अथक मेहनत घेतली जाते आहे. पंधरा जणांच्या या टीमने खास युक्ती लढवून लपलेल्या बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या इंजिन रूमजवळ असल्याचं दिसलं होतं त्यानंतर टीमने सुरूवातीला विविध युक्त्या लढवून त्याला परडण्याचा प्रयत्न केला जातो आहे. टीमने इंजिन युनिट बंद करून बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
गुरूवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास बिबट्या फॅक्टरीमध्ये शिरला होता. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी, जिल्हा वन अधिकारी, पशुवैद्यकीय डॉक्टर तसंच वन्यजीव निरीक्षकांची टीम साडेसहाच्या सुमारास घटनास्थळी पोहचली. सात-आठ जणांच्या दोन वेगवेगळी पथकं तयार करून बिबट्याचा शोध घेतला जात होता. पण तरीही लपून बसलेला बिबट्या सापडत नाही.
फॅक्टरीचा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला होता. इंजिन युनिट खूप मोठं असल्यामुळे बिबट्या नेमका कुठे असणार हे शोधणं कठीण होतं. बिबट्या फॅक्टरीच्या परिसरात फिरताना सीसीटीव्हीमध्ये पाहिलं पण त्याची नेमकी जागा कळत नव्हती. म्हणूनच लपलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही इंजिन रूममध्ये बकऱ्या ठेवल्या आणि इंजिन रूमची लाइट बंद केली. इंजिन रूममध्ये ठेवलेल्या सगळ्या बकऱ्या सुरक्षित असून बिबट्याने त्यांना मारलं नाही, अशी माहिती वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.
पोलिसांनी श्वानपथकाच्या मदतीने बचावकार्यात येण्याचा प्रयत्न केला होता, पण आम्ही त्यांना नकार दिला. तसंच फॅक्टरीच्या आत प्रवेश करायला मनाई केली होती, असं वन संरक्षक अधिकारी विनोद कुमार यांनी म्हंटलं आहे. बिबट्याला घाबरविण्यासाठी फॅक्टरीमध्ये फटाके फोडल्याचं बोललं जात होत, पण त्याला कुमार यांनी नकार दिला. फॅक्टरीत फटाके वाजविले नसल्याचं त्यांनी सांगितलं.
आत्तापर्यंतच्या बिबट्याला वाचविण्याच्या घटनांपैकी ही घटना सगळ्यात कठीण आणि आव्हानात्मक आहे. इंजिन युनिटमध्ये बिबट्याला लपायला खूप जागा असल्याने काम करणं कठीण असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. बिबट्याला वाचवणं हा आमचा हेतून असून ते आम्ही पूर्ण करणार. रात्रीच्या वेळी बिबट्याला पकडता येईल. मारूती सुझुकीच्या व्यवस्थापनाकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्याचा उद्देश असून त्यासाठी दोन दिवस लागले तरी चालणार आहेत, असं कुमार यांनी सांगितलं.
नेमकं काय घडलं?गुरूग्राममधील मानेसरमध्ये असलेल्या मारूती सुझुकीच्या प्रकल्पात बिबट्या घुसला. गुरूवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास बिबट्या मारूती सुझुकीच्या फॅक्टरीमध्ये घुसला. बिबट्या जेव्हा फॅक्टरीमध्ये घुसला त्यावेळी फॅक्टरीच्या आवारात कर्मचारी उपस्थित नव्हते. पण प्रकल्पातील सुरक्षा रक्षक आणि वाहतूक विभागाचे काही कर्मचारी कार्यालायात होते. फॅक्टरीमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा बचाव करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. गुरूवारी सकाळी बिबट्या मारूती सुझुकीच्या फॅक्टरीमध्ये शिरल्याने मॉर्निंग शिफ्टसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दाणादाण उडाली आहे.