ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27- भारतातल्या कार बाजारात सर्वात जास्त मागणी असलेल्या मारुती सुझुकीनं प्रीमिअम हॅचबॅकमधल्या बलेनो कारची 75,419 मॉडेल्स पुनर्दुरुस्तीसाठी परत मागवली आहेत. त्याप्रमाणेच इंधन फिल्टर सदोष असलेल्या 1,961 डिझायर डिझेल कारही परत मागवण्यात आल्या आहेत. ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींची तातडीनं दखल घेऊन कार दुरुस्तीसाठी मारुतीनं प्रसिद्धिपत्रक प्रसिद्ध केलं आहे.
3 ऑगस्ट 2015 ते 17 मे 2016 या कालावधीत तयार झालेल्या 15,995 कार कंपनीनं परत मागवल्या आहेत. ग्राहकांच्या तक्रारीनुसार काही कारच्या फ्युअल फिल्टरमध्ये दोष असल्याचं मारुती सुझुकीच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी या कार परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. 31 मेपासून मारुती सुझुकीचे डीलर कार विकत घेतलेल्या ग्राहकांशी संपर्क साधून नादुरुस्त कार परत मागवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचंही यावेळी कंपनीने सांगितलं आहे.