हॅलो, व्हेअर आर यू?गोर्इंग टू मुंब्रा...फॉर व्हॉट?स्टोरीसाठी...आर यू मॅड ?आय अॅम गोइंग टू व्हीजिट मस्जिद अल्सो.सिरियस्ली? जिवंत राहिलास तर मेसेज कर रात्री, हो आणि तिकडे काही खाऊ पिऊ नको, इट्स व्हेरी अनहायजेनिक एरिया
मशीद आणि नमाज पाहायला जातोय असं नुस्त सांगितलं तर मित्रानं असं भलंमोठं लेक्चर दिलं. मुंब्रा आणि मशिदीत गेलास की भलीमोठी 'नॉट टू डू' लिस्ट सांगितली. पहिल्यांदाच मशिदीत आत जाऊन तिथली व्यवस्था पाहाण्याची संधी मिळणार होती. एकीकडे नवं काहीतरी पाहायला मिळेल हा विचार आणि दुसरीकडे मित्राची वाक्य डोक्यात ठेवून मुंब्र्याला जायला निघालो.
गर्दी, लांबलचक रांगांमुळे मंदिरात जाणंही आताशा दुर्मिळ झालं आहे. कधीकधी सहज उत्सुकता म्हणून चर्च, सिनेगॉग, गुरुद्वारा पाहून झालं होतं. पण मशिदीत जाऊन काय चालतं ते पाहावं असा विचारही फारसा मनात येत नसे. सर्वत्र होणाऱ्या चर्चा आणि सांगोवांगीच्या कथा-गप्पांमुळे इच्छो असो वा अनिच्छा, थोडीशी भीती यामुळे मशिदींचा विषय वर्ज्य विषयांच्या यादीमध्ये जाऊन बसला होता. नाही म्हणायला एकदा दर्गा पाहून झाला होता आणि रस्त्यावर नमाज पढणाऱ्या लोकांना पाहून झालं होतं. पण कधी मशिदीत काय असतं, हे लोक नक्की करतात तरी काय, सगळे मुस्लीम आपल्याला सांगितल्याप्रमाणे चिडखोर, तापट असतात का? मशिदीत तलवारी असतात वगैरे भरपूर प्रश्न आणि कल्पना डोक्यात होत्या. त्यामुळे जमाते इस्लामी ए हिंदचं मशिद परिचयाचं आमंत्रण आल्यावर रविवार सुटीचा दिवस असला तरी जायचं नक्की केलं.
मुंब्र्यात एकेकाळी आजच्या इतकी लोकसंख्या नव्हती. कोकणातून आणि उत्तर भारतातून मुस्लीम इथं येऊन स्थायिक होऊ लागले. १९९२-९३ च्या दंगलीमध्ये मुंबईतील मुस्लीम इकडे येऊन स्थायिक झाले. मुंबईपेक्षा राहाण्यासाठी स्वस्त आणि मोकळ्या जागा त्यांना आवडल्या आणि हळूहळू त्यांची संख्या इथं वाढत गेली. आज महाराष्ट्राच्या इतर भागातून आलेले मुस्लीमही इथं येऊन स्थायिक झाले आहेत.
मुंब्रयाला अलफुर्कान मशिदीसमोर जमाते इस्लामी ए हिंदचं एक लहानसं स्टडी सेंटर होतं. मशिद परिचयासाठी आणखी दोनतीन पाहुणे बोलावण्यात आले होते. स्टडी सेंटरमध्ये अभ्यासाला येणाऱ्या मुलांना मदत करणारे निवृत्त शिक्षक महंमद मुस्तफा, अहमद आणि सैफ आसरे हे भाऊ आणि मुस्तफीज, ऐतशाम, परवेज हे इंजिनियर आमची वाटच पाहात होते.
(२०१७ साली ईदच्या वेळेस काढलेला दिल्ली येथील फोटो.... सौजन्य-एएफपी-पीटीआय)संध्याकाळी पाचच्या नमाजाची अजान झाल्यावर हे सगळे एकेक करुन नमाज पढून आले आणि नंतर आमच्याशी बोलायला मोकळे झाले. नमाजाला आलेलेल लोक निघून गेल्यावर सैफ सगळ्यांना मशिदीत घेऊन गेले. सैफनी सगळ्या टीमचा जवळजवळ ताबाच घेतला. आत जाताना सर्वजण अरेबिकमध्ये देवा दार उघड अशा आशयाचं वाक्य पुटपुटून प्रवेश करतात. एका बाजूस नमाजाचा हॉल आणि दुसऱ्या बाजूस वजूची जागा. त्याला वजूखाना म्हणतात. नमाजाला बसण्याआधी वजू करणं आवश्यक मानलं जातं. वजूखान्यात सात-आठ नळ रांगेने होते आणि त्यांच्यासमोर बसण्याची जागा. नाक, कान, डोळे, हात-पाय असं क्रमानं स्वच्छ करण्याची ती एकदम साग्रसंगित प्रक्रिया होती. त्यानंतर सैफ सर्वांना नमाजाच्या हॉलमध्ये घेऊन गेले. संगमरवरी फरशी घातलेल्या त्या हॉलच्या पश्चिमेस धर्मग्रंथ कुराण, काही पुस्तकं ठेवले आणि सहा घड्याळं लावली होती. विमानतळावर जसं देश-विदेशात किती वाजलेले असतील हे दाखवणारी घड्याळं असतात तशी ही घड्याळं होती पण ती ठराविक आकड्यांवर बंद होती. सैफ म्हणाले प्रत्येक मशिदीच्या नमाजाच्या वेळा थोड्याफार वेगवेगळ्या असतात.
पहाटे पहिली नमाज होते ती फजरची नमाज, मग दुपारी जेवणाच्या आसपास असते ती जोहर नंतर सूर्यास्तापूर्वी एक होते तिला आम्ही असर म्हणतो. चौथी नमाज मगरिप सूर्यास्ताच्यावेळेस होते आणि रात्री इशा नमाज होते. पण नमाज चुकल्या तर काय करता असं विचारल्यावर सैफ म्हणाले त्यासाठी रात्री खजा नावाची नमाज एकत्रित म्हणून करता येते. पण तो पर्याय रोज वापरायचा नसतो. पाचवेळा नमाज पढणं अपेक्षित आहे. नमाज म्हणजे दिवसभरात पाचवेळा देवाची आठवण होणे आणि जशी भूक लागते तशी प्रार्थनेची भूक प्रत्येकाला लागली पाहिजे. हे पाच वेळांचं गणित निसर्गाच्या चक्रानुसार लावलेलं आहे. प्रत्येकानं पहाटे लवकर उठून प्रार्थना करुन कामाला लागावं आणि रात्री पुन्ही प्रार्थना करुन लवकर झोपावं असं त्यामागचं गणित आहे.
आता मुस्तफिज, ऐतशाम आणि परवेझ हे इंजिनियर आणि मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये काम करत असल्यामुळे ते दुपारचे कसे नमाज पढत असावेत हा प्रश्न होताच. त्यावर ऐतशाम म्हणाला, ''साधारणत: आमच्या सगळ्यांच्या आॅफिसमध्ये नमाजासाठी वेगळी जागा आहे. आमच्या इमारतीत अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांची कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालयं आहेत. त्या सगळ्या कंपन्यांमधील लोक एकत्र येऊन आम्ही नमाज करतो. त्यासाठी एक व्हॉट्सअॅप ग्रुपसुद्धा तयार केला आहे. ठराविक वेळेस सर्वांना मेसेज करतो आणि सगळे एकत्र जमतात. नमाजासाठी मशिदीत गेलंच पाहिजे असं बंधन नाही. कोणत्याही स्वच्छ, कोरड्या जागेत नमाज पढलं तरी चालतं. इतकंच नाही तर बसल्या जागीही पढता येतं.''
सैफ आम्हाला पुढं नमाजाबद्दल सांगू लागले. मुस्तफिजनं अजान कशी देतात याचं प्रात्यक्षिकचं दाखवलं. अजान देणाऱ्या व्यक्तीला मोजिन म्हणतात, सैफ म्हणाले, अजान हा काही नमाजाचा भाग नाही. तर ते नमाजाला या असं लोकांना सांगणारं आमंत्रण आहे. अजानच्या आवाजामुळे लाऊड स्पीकरमुळे आजकाल शहरांमध्ये तक्रारी होतात त्याचं काय असं विचारल्यावर सैफ म्हणाले, शहरांमध्ये मशिदींना मिनार असतील असंच नाही मग लाऊड स्पीकर वापरले जातात. पण ठराविक डेसिबलची मर्यादा पाळली पाहिजे असं माझं मत आहे. शुक्रवारच्या नमाजाच्यावेळेस काही विषयांवर प्रबोधनही केलं जातं, अल्लाहच्या शिकवणीची आठवण करुन दिली जाते. हे प्रबोधनपर भाषणाचं काम इमाम करतात किंवा कोणी व्याख्यातेही बोलावले जातात.नमाज पढताना मुस्लीम लोक सतत उठत बसून कधी वज्रासनात, मान फिरवताना टीव्हीत पाहिलं होतं. त्याबद्दल विचारल्यावर सैफ सांगू लागले, ''नमाजामध्ये सुरुवातीस मला एकाग्र होऊ दे अशी अल्लाकडे प्रार्थना केली जाते. सुरुवातीस हात बांधून मक्केच्या दिशेने उभे राहातात. त्यानंतर ईशस्तुतीनंतर कंबरेत वाकून मी तुझ्यासमोर मस्तक झुकवतो असे सांगून प्रार्थना केली जाते. त्यानंतर शेवटी गुडघे, नाक आणि कपाळ जमिनीवर टेकवून प्रार्थना केली जाते. नमाजात कुराणामधील आयत मनातल्या मनात म्हटले जातात. या एका चक्रास रकत असे म्हटले जाते. या रकतच्या संख्येत नमाजानुसार बदल होतो. शेवटच्या रकतामध्ये वज्रासनात बसून दोन्ही बाजूस मान फिरवली जाते, त्याचा अर्थ हे देवा माझ्या दोन्ही बाजूच्या लोकांवर कृपादृष्टी ठेव असा होतो.''
(२०१७ साली ईदच्या वेळेस काढलेला दिल्ली येथील फोटो.... सौजन्य-एएफपी-पीटीआय)त्यानंतर कुराण आणि तिथे ठेवलेली दुसरी पुस्तकं आम्हाला दाखवण्यात आली. कुराणामध्ये ११४ सुरा आहेत. सुरा म्हणजे एकप्रकारचे अध्यायचं. त्या प्रत्येक सुरामध्ये आयत म्हणजे श्लोक असतात. कुराणाबरोबरच काही इतर पुस्तकंही होती. कुराणाचा भावार्थ सांगणारी विविध लेखकांची पुस्तकं मशिदीमध्ये ठेवलेली असतात. आमचं हे बोलणं सुरु असतानाच संध्याकाळच्या नमाजाची वेळ झाली. त्याची अजान सुरु होण्यापुर्वीच आम्ही बाहेरच्या मोकळ्या जागेत येऊन बसलो.अजान सुरु झाल्यावर एकेकजण रांगेने आत येऊन वजू करु लागले. झब्बा, पायजम्यातील मुलं, लुंगी नेसलेले थोडेसे वृद्ध एकापाठोपाठ एक आत येऊ लागले. काही लोकांनी मशिदीतील गोल टोप्या डोक्यावर घेतल्या, काहींनी खिशातून टोप्या बाहेर काढल्या तर काहींनी थेट रुमाल घेतले. प्रत्येकाच्या अत्तरांच्या वासांचा एक स्वतंत्र अत्तराचा वास तयार झाला होता. वृद्ध लोकांनी मशिदीतली स्टुलं पकडली आणि त्यांनी भिंतीच्या बाजूला एक वेगळी रांग केली. साधारणत: दहा मिनिटांच्या प्रार्थनेनंतर लोक निघू लागले. काही लोक तसेच रेंगाळत गप्पा मारत होते. नमाजच्या निमित्ताने लोक एकत्र येतात, एकमेकांना भेटतात, चार विषयांवर चर्चा करतात, गप्पा मारतात असं सैफ म्हणाले. मगाशी मशिदीच्या मुख्य खोलीत आणि आता बाहेर आम्हाला पाहून येणारे जाणारे थोड्या आश्चर्याने आणि कुतुहलाने पाहात होते.
थोड्या वेळानं त्यांनी शेजारच्या इमारतीत महिलांच्या नमाजाची जागा दाखवली. महिलांसाठी तेथे स्पीकरही लावले होते. त्यांचे तेथे वेगवेगळे कार्यक्रमही होतात. असं एकेक पाहात शेवटी आम्ही मशिदीच्या इमारतीत परतलो. ईद किंवा शुक्रवारच्या दिवशी गर्दी होत असल्यामुळे तेव्हा मशिदीचे वरचे मजले नमाजासाठी वापरले जातात. तिसऱ्या मजल्यावर गेल्यावर एकत्र जेवणाचा आनंद घेताना वेगवेगळ्या शंकांवर पुन्हा बोलणं झालं. 'जमात ए इस्लामी हिंद' मुंब्र्यामध्ये एक बिनव्याजी कर्ज देणारी संस्थाही चालवते. स्वयंरोजगार करण्यासाठी लोकांना दहा हजार रुपये बिनव्याजी दिले जातात, प्रत्येक महिन्याला एक हजार असे दहा हप्त्यांत ते परत घेतले जातात. या सोयीचा फायदा १५०० लोकांनी तरी घेतला आहे. घरगुती वाद सोडवणं, अत्यंत गरीब एकट्या पडलेल्या लोकांना महिन्याभराचं रेशन देणं अशी मदतीची कामंही होतात.
हे सगळं मशीद परिचय वगैरे करण्याचा हेतू सैफ यांनी सांगितला. लोकांना मशिदीबद्दल काहीच माहिती नसतं. आम्ही हिंदूंच्या ग्रंथांबाबत, देवाबाबत, पुराणाबाबत थोडंतरी ऐकून असतो किंवा टीव्ही, सिनेमात पाहिलेलं असतं. मात्र हिंदुंना शेजारी राहूनही या गोष्टी समजत नाहीत. बहुतांशवेळा आम्ही तुमच्याकडे पाहात नाही तुम्हीही आमच्याकडे पाहू नका असा पवित्रा दोन्ही समाज घेतात. त्यामुळं आधीच असलेले गैरसमज गडद होत जातात. मशिदीमध्ये तलवारी असतात असे समज असतात ते आमच्या कानावर आले म्हणून आम्ही हा प्रयोग करायचा ठरवला. याला आता चांगला प्रतिसाद मिळतोय. संवाद नाही केला किंवा एकमेकांकडे आपण गेलोच नाही तर काहीच समजणार नाही, गैरसमजांचं रुपांतर द्वेषात आणि पर्यायानं भांडणात होत राहिल.
(२०१७ साली ईदच्या वेळेस काढलेला दिल्ली येथील फोटो.... सौजन्य-एएफपी-पीटीआय)संध्याकाळपासून या सगळ्यांची आमच्या चहापाण्यासाठी, जेवणासाठी धावपळ चालली होती. कितीही बोललं तरी मनामध्ये पंथभेद, बुरखा, तलाक यावरचे प्रश्न उरलेच होते. पण या गप्पांमध्ये तीन चार तास निघून गेले होते, त्यामुळे निरोप घेणं भाग होतं. गावगप्पांवर अवलंबून राहिल्यामुळं बऱ्याच गोष्टींना आपण मुकतो. एखादा अनुभव घेण्याआधीच प्रतिक्रिया देण्याच्या आणि सोशल मीडियावर आम्हाला सगळं माहितीयं अशा थाटात व्यक्त होण्याच्या काळात सर्वांनी प्रतिक्रियेआधी थोडं थांबून विचार करायला हवा असं वाटतं. अभ्यासाविना आपण जी तत्काळ प्रतिक्रिया देत आहोत तिचे परिणाम आपण लक्षात घ्यायला हवेत.कदाचित तीन-चार तासांमध्ये एखाद्या धर्मातील संपूर्ण व्यवस्था समजणे अशक्य आहे, धर्म समजणं तर त्याहून कठिण काम. पण अशा कार्यक्रमांमुळे कोंडी तर फुटेल. शीरखुर्मा, इत्र, शेवया, पतंग आणि यापलिकडे दोन धर्मांची ओळख जाऊ शकते. एकत्र राहाणाऱ्या दोन समुदायांनी सतत एकमेकांवर संशय घेत राहाण्यापेक्षा असा संवाद कधीही चांगलाच म्हणावा लागेल.