नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रांनी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. त्यानंतर, भाजपाने हे मोदी सरकारचं मोठं यश असल्याचं म्हटले आहे. मात्र, याप्रकरणावरुन एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असुदुद्दीने औवेसींनी मोदी सरकारला प्रश्न विचारला आहे. चीनसोबत तुम्ही काय तडजोड केली? असा प्रश्न औवेसींनी विचारला आहे. तसेच अद्यापही अजहर खुलेआम फिरत असल्याचे औवेसींनी म्हटले आहे.
सन 2008 मध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला ब्लॅकलीस्ट करण्यात आले होते. तरीही, आज तो खुलेआम फिरतोय. त्याला सार्वजनिक ठिकाणी बंदी आहे का? पाकिस्तानात त्याचा पक्ष निवडणूक लढवत नाही का? नक्कीच मसूद अजहरवरी बंदी आणली आहे. मात्र, ही कुठलिही मोठी उपलब्धी नसल्याचे औवेसी यांनी म्हटले आहे. त्यामुळे मोदी सरकारचा दावा औवेसी यांनी अमान्य केल्याचे दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देर आए दुरुस्त आए' म्हणत संयुक्त राष्ट्रांचे आभार मानले. दहशतवादविरोधी लढ्याबाबत भारताला मिळालेलं हे मोठं यश आहे. तसेच, हा नवीन भारत असून 130 कोटी देशवासीयांचा आवाज जगभरात ऐकला जातो, असेही मोदींनी म्हटले होते. आता, भारताकडे दुर्लक्ष करता येत नाही. ही तर सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या..., असे म्हणत मोदींनी मसूद अजहरबाबत संयुक्त राष्ट्राने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले होते.
भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या लढ्याला आज मोठे यश मिळाले आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि भारतामध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी आज आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नांमध्ये चीननं वारंवार खोडा घातला होता. त्यामुळे मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात अडथळे येत होते. मात्र, अजहर प्रकरणात अडथळा आणला जाणार नसल्याचे संकेत चीनकडून देण्यात आले होते. त्यानंतर, अखेर आज अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले. मात्र, एमआयएम खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी मसूद अजहरच्या बंदीला आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याला मोठी उपलब्धी मानता येणार नसल्याचे म्हटले आहे.