कंदाहार विमान प्रकरणात मुक्तता करण्यात आलेला जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याला विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यावेळी क्लिन चीट दिली होती असा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. त्यासाठी डोवाल यांनी २०१० साली दिलेल्या मुलाखतीचा आधार घेतला आहे.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी एका भाषणात उपरोधिक शैलीत ‘मसूद अजहरजी' असा उल्लेख केला. त्यावरून त्यांच्यावर भाजपाने कडक टीका केली होती. राहुल गांधी यांच्या विधानांचा भाजप विपर्यास करत असल्याचे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले होते. या पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, डोवाल यांनी जाणता-अजाणता गोपनीय गोष्टी या मुलाखतीत उघड केल्या होत्या. मसूद अजहरची मुक्तता करणे हा राजकीय निर्णय होता असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे मसूदची सुटका ही राष्ट्रविरोधी कृती होती असे आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय विधीमंत्री रविशंकरप्रसाद यांनी मान्य करतील काय असा सवालही सुरजेवाला यांनी विचारला आहे.भाजपा सरकार कणखर का राहिले नाही?मसूद अजहर याला आयइडीचा स्फोट कसा करावा याचे अजिबात ज्ञान नाही, तो नेमबाजही नाही, मसूदची मुक्तता केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील पर्यटनात २०० टक्के वाढ झाली अशी विधाने डोवाल यांनी नऊ वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत केल्याचे सुरजेवाला यांनी म्हटले आहे. कंदाहार विमान अपहरण प्रकरणी दहशतवाद्यांशी कोणतीही चर्चा करू नका, कोणापुढेही झुकू नका असे काँग्रेसप्रणित यूपीएचे धोरण होते. या सच्च्या राष्ट्रवादी धोरणाबद्दल डोवाल यांनी या मुलाखतीत काँग्रेसचे कौतुकच केले आहे असा दावाही सुरजेवाला यांनी केला. यूपीएसारखेच कणखर धोरण तत्कालीन भाजपा सरकारने कंदाहार विमान अपहरण प्रकरणात का स्वीकारले नाही असाही सवाल सुरजेवाला यांनी केला आहे.
मसूद अजहरला अजित डोवाल यांनी दिली होती क्लिन चीट; काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 6:33 AM