जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात राजौरी येथे भारतीय लष्करावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. राजौरी येथे दहशतवाद्यांनी हल्ला केल्याप्रकरणी चार स्थानिक नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी चार स्थानिकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. काही स्थानिकांनी दहशतवाद्यांची मदत केल्याचा आरोप केला जात आहे.
गुरुवारी सशस्त्र दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. यात ५ जवान शहीद झाले आणि दोन जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर 'ढेरा की गली' घनदाट जंगलात कालपासून लष्कराचे जवान शोध मोहीम राबवत आहे. भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने या भागात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संयुक्त मोहीम सुरू केली आहे.
घनदाट जंगलात जमिनीवर शोध घेण्याबरोबरच हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या माध्यमातून आकाशातून पाळत ठेवली जात आहे. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही स्थानिक लोकांनी दहशतवाद्यांची मदत केली असा संशय पोलीस आणि तपास यंत्रणेला आहे. सुरक्षा दलांनी चार स्थानिक नागरिकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. १६ व्या कोर च्या जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी घटनास्थळी भेट दिली. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी श्वास पथक तैनात करण्यात आले आहे.
दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ची पाकिस्तानस्थित शाखा पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (PFF) ने स्वीकारली आहे. लेफ्टनंट कर्नल सुनील बारटवाल यांनी सांगितले की, दहशतवाद्यांबाबत मिळालेल्या भक्कम गुप्त माहितीच्या आधारे बुधवारी रात्री पूंछ जिल्ह्यातील ढेरा की गली भागात संयुक्त शोध मोहीम राबवण्यात आली. सैनिक घटनास्थळाकडे जात असताना दहशतवाद्यांनी दोन वाहनांवर गोळीबार केला.