मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या सरकारी बंगल्याजवळील राज्य सचिवालय संकुलाच्या इमारतीला शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागली, अशी माहिती पोलिसांनी दिली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तैनात करण्यात आल्याचे सांगितले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
विरोधक मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत; लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देणार?
गेल्या वर्षी मे महिन्यात मणिपूरमध्ये मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये हिंसाचार उसळला होता. तेव्हापासून जवळपास २०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झाल्यानंतर हजारो लोक विस्थापित झाले आहेत. या आगीत घरे आणि सरकारी इमारती जळून खाक झाल्या. गेल्या काही दिवसांत जिरीबाममधून ताज्या हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या वैयक्तिक सुरक्षा पथकावर कांगपोकपी जिल्ह्यात संशयित सशस्त्र अतिरेक्यांनी हल्ला केला होता, यात एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाला होता. पोलिसांनी सांगितले की, सकाळी ११.१५ च्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे एक आगाऊ पथक, जे हिंसाचारग्रस्त जिरीबामच्या मार्गावर होते, त्यांनी के.के. सिनम गावाजवळ काही अज्ञात चोरट्यांनी हल्ला केला. मोइरंगथेम अजेश असे जखमी सुरक्षा जवानाचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पथक इंफाळहून जिरीबामला रवाना झाले. त्यानंतर मुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. संशयित कुकी अतिरेक्यांनी आसामच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यात विविध ठिकाणी अनेक हल्ले केले आहेत आणि आतापर्यंत कुकी अतिरेक्यांनी तीन पोलिस ठाणी, एका विशिष्ट वांशिक गटाच्या मोठ्या संख्येने घरे जाळली आहेत. मुख्यमंत्र्यांनी सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह आणि पोलीस महासंचालक मणिपूर यांना जिरीबाममधील परिस्थितीचा तपशीलवार अहवाल देण्यास सांगितले आहे.