नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील गोकुळपुरी भागात शुक्रवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या अपघातात आतापर्यंत 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 13 गाड्या दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यात आल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले आहे.
पूर्व दिल्लीचे अतिरिक्त डीसीपी म्हणाले की, "रात्री 1 वाजता गोकुळपुरी पोलीस स्टेशन परिसरात आग लागली. सर्व बचाव उपकरणांसह पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली. आम्ही अग्निशमन दलाशी देखील संपर्क साधला, त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. जवळपास चार वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीच्या घटनेत अनेक झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या असून 7 जणांना प्राण गमवावे लागले आहेत."
याचबरोबर, दिल्ली अग्निशमन दलाचे संचालक अतुल गर्ग यांनाही आगीची माहिती दिले आहे. ते म्हणाले, "आम्ही 7 जळालेले मृतदेह बाहेर काढले, ज्यांची ओळख पटलेली नाही. असे दिसते की हे लोक झोपले होते आणि आग खूप वेगाने पसरली म्हणून ते बाहेर पडू शकले नाहीत. तसेच 60 झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. आम्हाला अद्याप या आगीचे कारण समजू शकले नाही"
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी व्यक्त केला शोक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगीच्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. सकाळी ही दुःखद बातमी ऐकली. मी स्वतः घटनास्थळी जाऊन पीडितांना भेटणार आहे, असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.