Kuwait Fire: दक्षिण कुवेतमध्ये एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४० भारतीयांचा मृत्यू झाला. या भीषण आगीत इमारत पूर्णपणे जळून खाक झाली. ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीत मजूर राहत होते. त्यातील बहुसंख्य हे भारतीय होते. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत परराष्ट्र मंत्र्यांना कुवेतला जाण्याचे आदेश दिले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेत काही लोकांचा मृत्यू आगीमुळे झाला. तर धुरामुळे गुदमरून मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
कुवेतमध्ये एका बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत ४० भारतीय नागरिकांसह ४१ लोकांचा मृत्यू झाला, तर ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अल-मंगफ नावाच्या इमारतीत ही आग लागली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल सांगितले की मृतांमध्ये बहुतांश भारतीय नागरिक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. स्थानिक वेळेनुसार बुधवारी पहाटे चारच्या सुमारास ही भीषण आग लागली. ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीत मोठ्या संख्येने भारतीय मजूर राहत होते.
या घटनेनंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह कुवेत दौऱ्यावर रवाना झाले आहेत. आगीच्या घटनेत जखमी झालेल्यांना मदतीची देखरेख करण्यासाठी आणि मृतांचे मृतदेह त्वरीत परत आणण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह तात्काळ कुवेतला रवाना झालेत.
पहाटे चार वाजता मजूर झोपलेले असताना आग लागल्याने अपघातातील मृतांचा आकडा वाढला. अचानक लागलेल्या आगीमुळे लोकांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही आणि झोपेतच त्यांचा जीव गुदमरला. ही इमारत एनबीटीसी ग्रुप नावाच्या कंपनीने घेतली असून त्यात १९५ कामगार राहत होते. यातील बहुतांश लोक हे केरळ, तामिळनाडू आणि काही उत्तर भारतीय राज्यांतील होते.
"कुवेतमधील कामगारांच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत केरळवासीयांसह ४० हून अधिक भारतीयांचा मृत्यू झाल्याने धक्का बसला आहे आणि शोक व्यक्त केला आहे. शोकाकुल कुटुंबियांबद्दल माझे मनःपूर्वक संवेदना आणि जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटलं आहे.