नवी दिल्ली - सौरवादळ हे नेहमीच वैज्ञानिकांसाठी एक चिंतेचा विषय आहे. असं असतानाच आता पृथ्वीच्या दिशेने आणखी एक नवीन संकट येत आहे. ज्यामुळे पृथ्वीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सौरवादळ येणार असून यामुळे ब्लॅकआऊटचा मोठा धोका असल्याचं म्हटलं आहे. अंतराळ हवामान अभ्यासक आणि फिजिसिस्ट डॉ. तमिथा स्कोव यांनी याबाबत माहिती दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
लांब सापासारख्या सोलर फ्लेअर्स पृथ्वीला धडकतील. नासाने देखील यापूर्वीच 19 जुलैला हे सौरवादळ पृथ्वीला धडकू शकतं असा अंदाज वर्तवला होता. याचा परिणाम सॅटेलाईट, जीपीएस, रेडिओ अशा विविध गोष्टींवर होऊ शकतो. सौरवादळामुळे पृथ्वीवरील उंच भागातील वीज जाण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे. रेडिओ सिग्नलवरही याचा परिणाम होईल.
पृथ्वीच्या वातावरणातील सगळ्यात वरच्या थरात असलेल्या कृत्रिम उपग्रहांना याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. तसेच, जीपीएस (GPS) आणि मोबाईल सिग्नलवरही (Mobile Signal) याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे पृथ्वीवर ठिकठिकाणी ब्लॅकआऊट होऊन बऱ्याच क्षेत्रांचा संपर्क तुटू शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.
सौरवादळ धडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 1989 साली आलेल्या एका सौरवादळाचा परिणाम कॅनडा देशातील क्युबेक शहरावर दिसून आला होता. त्यापूर्वी 1859 साली आलेल्या एका सौरवादळामुळे अमेरिका आणि युरोपातील टेलिग्राफ नेटवर्क बंद पडलं होतं. सौर वादळाला जियोमैग्नेटिक स्टॉर्म आणि सोलर स्टॉर्म असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.