चंदीगड/पणजी : विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात पंजाब आणि गोव्यात शनिवारी अनुक्रमे ७० टक्के व ८३ टक्के मतदान झाल्याने, दोन्ही राज्यांत काँग्रेस व आम आदमी पार्टीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पंजाबमध्ये पुन्हा सत्ता येणार नाही, याचा भाजपाला अंदाज होताच, पण गोव्यातही भाजपाला विजयाची खात्री वाटेनाशी झाली आहे. त्यामुळे भाजपाचे नेते तणावाखाली आहेत. दोन्ही राज्यांत काही किरकोळ घटना वगळता शांतपणे मतदान झाले. गोव्यात भाजपा, काँग्रेस, आप, तसेच मराठी भाषा विचार मंच, शिवसेना, मगोप यांची आघाडी अशी चौरंगी लढत आहे. मात्र, काँग्रेसला सर्वाधिक, पण बहुमतापेक्षा कमी जागा मिळतील आणि भाजपा दुसऱ्या क्रमांकावर राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे. कालपर्यंत आम्हाला १७ जागा मिळतील, असे सांगणाऱ्या भाजपा नेत्यांची तोंडे आज उतरली होती. काँग्रेसचे नेते मगोपच्या साह्याने गोव्यात सरकार बनवू, असे सांगू लागले आहेत. (प्रतिनिधी/वृत्तसंस्था)पंजाबमधील काँग्रेस नेते ठामदिल्लीत सत्ता मिळवणाऱ्या आपने पहिल्यांदाच या दोन्ही राज्यांत आपले उमेदवार उभे केले. त्यापैकी पंजाबात लढत प्रामुख्याने काँग्रेस व आपमध्येच होईल आणि अकाली व भाजपाची आघाडी तिसऱ्या क्रमांकावर राहील, हे स्पष्ट आहे. मात्र, आम्ही दोन्ही राज्यांत सत्ता मिळवू, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी आज केला. पंजाबातील काँग्रेसचा विजय ही माझ्यातर्फे राहुल गांधी यांना भेट असेल, असे नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज जाहीरच करून टाकले. कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा केला. पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजपा युती गेल्या दशकापासून सत्तेवर आहे.
पंजाब, गोव्यात प्रचंड मतदान
By admin | Published: February 05, 2017 4:15 AM