हैदराबाद - जगातील सर्वात वयोवृद्ध 'युट्युबर शेफ' मस्तनम्मा यांचे निधन झाले आहे. आंध्र प्रदेशमधील गुंटूर या मूळ गावी वयाच्या 107 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झणझणीत चिकन आणि मटन बनवणारी युट्युबवाली आज्जी अशी त्यांनी जगाला ओळख होती. युट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून या आजी जगभर पसरल्या होत्या. विशेष म्हणजे केवळ 2 वर्षात या आजीच्या युट्यूब चॅनेलला 12 लाख सबस्क्राईबर्स मिळाले होते. आता, या सबस्काईब्रर्सची संख्या 1.2 मिलियन्स एवढी झाली आहे.
शिकण्याला वयाचे बंधन नसते, असे म्हणतात. माणसाला केवळ शिकण्याची ओढ असायला हवी. तो कोणत्याही वयात काहीही शिकू शकतो. याचे चालते-बोलते उदाहरण म्हणजे 106 वर्षांच्या या ‘अम्मा.’ आंध्र प्रदेशच्या रहिवासी असलेल्या मस्तनम्मा यांचा सध्या इंटरनेटवर बोलबोला होता. कारण, त्या भारताच्या सर्वात वयस्कर यूट्यूबर होत्या. यूट्यूबवर मस्तनम्माच्या कामाची खूप प्रशंसा होते. यू ट्यूबवर कंट्रीफूड नावाचे त्यांचे चॅनल आहे. त्यांचा नातू लक्ष्मण हे चॅनल चालवितो. लक्ष्मणच त्यांचे व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट करतो. मस्तनम्मा यांना स्वयंपाकाची आवड. तुम्ही त्यांचे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला त्यांचे त्यांच्या कामावरील प्रेम दिसून येईल. त्या अत्यंत सहजपणे हे सर्व करायच्या. मस्तनम्मा चॅनलचे जवळपास 1.2 मिलियन्स सबस्क्रायबर आहेत. त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येक व्हिडिओवर व्ह्यूजची संख्याही लाखांच्या घरात असते. त्यांचे काही व्हिडिओतर दहा लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत. कंट्रीफूड चॅनलवर तुम्हाला मस्तनम्माच्या चविष्ट रेसिपी मिळतील. मस्तनम्मा यांना प्रेमाने सर्व जण ग्रॅनी म्हणतात. त्या याच नावाने प्रसिद्ध आहेत. ग्रॅनी त्यांच्या गावातच नाहीतर यूट्यूब जगतातही स्टार बनल्या होत्या, पण आता त्या केवळ आठवणींमध्येच उरल्या आहेत.
दरम्यान, गेल्या 6 महिन्यांपासून मस्तनम्मा आजारी असल्यामुळे त्यांच्या रसरसीत पदार्थांचे व्हिडीओ बनविण्यात आले नाहीत. त्यामुळे अनेकदा मस्तनम्माच्या चाहत्यांनी यांसंदर्भात विचारणाही केली होती. मात्र, सोमवारी मस्तनम्माचे व्हिडीओ बनविणाऱ्या युट्युबर्संनी मस्तनम्माच्या अखेरच्या प्रवासाचा व्हिडीओ शेअर करुन त्यांच्या निधनाची दु:खद बातमी जाहीर केली. या बातमीमुळे लाखो नेटीझन्सवर शोककळा पसरली.