प्रकाश बेळगोजी
भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने बेळगाव मधील व्हॅक्सिन डेपोवर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेतील 'त्या' अफलातून झेलाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करत बेळगावच्या टेनिस बॉल क्रिकेटची दखल घेतली आहे. एवढेच नव्हे तर न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनी देखील त्या झेलाबद्दल ट्विट केल्यामुळे बेळगावचे टेनिस बॉल क्रिकेट जगप्रसिद्ध झाले आहे.
सध्या शहरातील टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर श्री स्पोर्ट्स आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या एसआरएस संघाविरोधीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात काल साईराज वॉरियर्सच्या किरण तरळेकर याने सीमारेषेवर अफलातून झेल पकडला होता. या झेलाचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शेअर केला आहे. 'हे तेंव्हाच घडतं जेंव्हा ज्याला फुटबॉल देखील खेळता येतो अशा खेळाडूला तुम्ही आणता' (दिस इज व्हॉट हॅपन्स व्हेन यू ब्रिंग अ गाय हू अल्सो नोस हाऊ टू प्ले फुटबॉल) अशा शब्दात किरण तळेकर यांने पकडलेल्या झेलाचा व्हिडीओ सचिनने शेअर करत बेळगावच्या टेनिस बॉल क्रिकेटची दखल घेतली आहे.
भारताच्या महान फलंदाजांपैकी एक असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने दोन महिन्यापूर्वीच गोव्याला जाताना मच्छे येथील एका चहाच्या कॅन्टीनमध्ये चहाचा स्वाद घेत बेळगावबद्दल आपुलकीचे उद्गार काढले होते. जगातील दिग्गज फलंदाजांपैकी एक असलेला सचिन तेंडुलकर एका साध्या चहा कॅन्टीनमध्ये चहा पिऊन जाण्याची ती घटना त्यावेळी चर्चेचा विषय झाली होती. आता पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तेंडुलकर यांनी स्वतःच्या ट्विटर हँडल बेळगावचा अप्रत्यक्ष उल्लेख केला आहे. त्यामुळे बेळगाव राष्ट्रीय तर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. एकंदर बेळगावचे टेनिस क्रिकेट आता राष्ट्रीय स्तरावर झळकू लागले आहे. अलीकडेच यशस्वीरित्या संपन्न झालेल्या आमदार अनिल बेनके चषक खुल्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत देशाच्या कानाकोपऱ्यातील मातब्बर खेळाडूंनी सहभाग दर्शविल्यामुळे त्याची मोठी चर्चा झाली होती. व्हॅक्सिन डेपो मैदानावरील श्री चषक क्रिकेट स्पर्धेतील किरण तरळेकर यांच्या झेलामुळे पुन्हा एकदा बेळगावचे टेनिस बॉल क्रिकेट चर्चेत आले आहे.
बेळगाव व्हॅक्सिन डेपो मैदानावर बेळगावच्या किरण तरळेकर याने सीमारेषेवर घेतलेला अप्रतिम झेल जगभर प्रसिद्ध झाला असून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह न्युझीलंड अष्टपैलू खेळाडू जिमी निशम आणि कर्णधार मायकेल वॉन यांनी देखील त्याची दखल घेतली आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवर ट्वीट करत झेलाचा व्हिडीओ शेअर केला आहे.