बंगळुरू - कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करता न आल्याने कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार मंगळवारी कोसळले. कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर आता भाजपाने सरकार स्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, नव्या सरकारच्या स्थापनेच्या मार्गात कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी भाजपाने मास्टरप्लान तयार केला आहे. त्यामुळे सध्या मुंबईत तळ ठोकून असलेले काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदार येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरच बंगळुरू येथे परतणार आहेत. कुमारस्वामी सरकार बहुमत मिळवण्यात अपयशी ठरल्याने बंडखोर आमदार खूप आनंदी असल्याचा दावा भाजपामधील सूत्रांनी केला आहे. बंडखोरांना जे हवे होते ते मिळाले आहे. आता हे आमदार येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंत बंगळुरूमध्ये माधारी येतील. दरम्यान, आपली बंडखोरी आणि सरकारचा पाठिंबा काढून घेण्यामागे भाजपाचा हात असल्याचे वृत्त संबंधित बंडखोर आमदारांनी फेटाळून लावले होते. सरकार स्थापन करण्यासाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी मध्यरात्री भाजपाच्या आमदारांची बैठक येडियुरप्पांच्या अध्यक्षतेखाली एका हॉटेलमध्ये झाली होती. आज पुन्हा 11 वाजता भाजपा आमदारांची बैठक होणार आहे. तसेच येडियुरप्पांनी भाजपाध्यक्ष अमित शाहांना पत्र लिहून समर्थन दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते सदानंद गौडा यांनी येडियुरप्पाच कर्नाटकत भाजपाचे मुख्यमंत्री असतील, असं स्पष्ट केलं आहे. भाजपा नेते जगदीश शेट्टार म्हणाले, आमच्याकडे 105 आमदारांचं संख्याबळ आहे. सभागृहात बहुमत असल्यानं आम्ही सरकार बनवणार आहोत. तसेच काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांचे राजीनामे अद्याप कर्नाटकातल्या विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारलेले नाहीत. आता ते भाजपाबरोबर जातात की नाही, येत्या काळात समजणार आहे.