ऑनलाइन लोकमत
जिंद, दि. १४ - हरयाणातील जिंदमध्ये एका महिलेने रुग्णालयाच्या वाटेवर असताना रुग्णवाहिकेतच अर्भकाला जन्म दिला. बुधवारी ही घटना घडली. सदर महिलेच्या कुटुंबियांनी यासाठी रुग्णालयाच्या निष्काळाजी कारभाराला जबाबदार ठरवले आहे. सरीता असे प्रसूत झालेल्या महिलेचे नाव आहे.
मंगळवारी रात्री सरीताला प्रसूतीच्या कळा सुरु झाल्यानंतर तिला सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी सकाळी प्रसूती कळा वाढल्यानंतर शेवटच्या क्षणी सिव्हील रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला पीजीआय खानपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. कुटुंबियांनी लगेचच रुग्णावाहिकेची व्यवस्था केली.
सरीताला रुग्णालयात नेण्यात येत असताना नूरान खेरा गावामध्ये रुग्णवाहिकेतच तिने अर्भकाला जन्म दिला. अर्भकाची आणि आईची दोघांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णवाहिकेत प्रसूती झाल्यानंतर कुटुंबिय सरीताला पुन्हा सिव्हील रुग्णालयात घेऊन आले.
शेवटच्या क्षणी दुस-या हॉस्पिटलमध्ये पाठवू नका अशी आम्ही डॉक्टरांना विनंती केली होती. पण डॉक्टरांनी आमचे ऐकले नाही असा आरोप कुटुंबियांनी केला.