संतोष सूर्यवंशीमथुरा : श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या मथुरेत भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार हेमा मालिनी यांना लोकसभेची उमदेवारी मिळाली आहे. गेल्या दोन पंचवार्षिक खासदार असलेल्या हेमा यांना ब्रीजवासी हॅट्रीक साधण्याची संधी देतील का, असा प्रश्न आहे. काँग्रेस-सपा आघाडीचे उमेदवार मुकेश धनगर यांच त्यांच्यासमोर आव्हान असेल.
काॅंग्रेसने बाॅक्सर विजेंदर सिंह यांची मथुरा लोकसभेसाठी चाचपणी केली होती. परंतु त्यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने ऐनवेळी मुकेश धनगर यांना उमेदवारी दिली आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांमध्ये प्रचार करण्याचे आव्हान धनगर यांंच्यासमोर असेल. धनगर हे जाट समाजातून येत असल्याने त्याचा लाभ त्यांना मतदारसंघात मिळण्याची शक्यता आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्देमथुरेत यमुना नदीच्या स्वच्छतेचा गंभीर मुद्दा आहे. हेमा मालिनी व मुकेश धनगर यांच्यासमोर हा कळीचा मुद्दा असेल. मथुरेत गेल्या दहा वर्षांत पाहिजे तशी रस्त्यांची जाळे विस्तारलेली नाहीत. त्यामुळे याबाबत जनतेत थोडी नाराजी आहे.बसपाने सुरेश सिंह यांना उमेदवारी दिल्याने मथुरेत आता तिरंगी लढत रंगून मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.