मुंबई - सोशल मीडियावर सध्या वेगाने एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, मुथरा येथील विकास बाजारचा हा व्हिडिओ असून एका मुस्लीम डोसा विक्रेत्याला मारहाण केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. डोसा विक्रेता श्रीनाथ नावाने आपले डोसा विक्रीचे दुकान चालवत आहे. देविराज पंडित नावाच्या एका फेसबुक युजर्संने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, जमावाकडून डोसा विक्रेत्याच्या दुकानाची तोडफोड करण्यात आल्याचे दिसून येते.
मथुरा येथील विकास बाजारातील ही घटना असून व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे व्हिडिओ शेअर करणारा देविराज पंडित हाच या गर्दीचे नेतृत्व करत असल्याचं दिसून येत आहे. व्हिडिओत एक व्यक्ती यह श्रीनाथ डोसा है... असे म्हणत असून दुसरा व्यक्ती मुस्लीम डोसा विक्रेत्याला त्याचं नाव विचारत आहे. तू हिंदू नाव असलेल्या श्रीनाथजींच्या नावाने आपलं दुकान का चालवतो?, असा प्रश्न डोसा विक्रेत्याला विचारला जात आहे. त्यावेळी, आणखी एक व्यक्ती डोसा विक्रेत्याला जमजावून सांगताना दिसत आहे. त्यामध्ये, तुम्ही हिंदू नाव लावून का दुकाना चालवता, ते नाव पाहूनच हिंदू धर्मीय लोक इच्छा नसतानाही येथे खायला येतात, असे त्याने म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेप्रकरणी मथुरा पोलिसांनी माहिती दिली आहे. डोसा विक्रेत्याच्या दुकानाच्या नावावरुन हा वाद झाला आहे. काही लोकांनी डोसाविक्रेत्याला शिवीगाळ केली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या, पोलीस तपास सुरू असून संबंधित व्यक्तीची चौकशी करण्यात येत आहे. तसेच, संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.