ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. ३ - उत्तरप्रदेशात मथुरेमध्ये जवाहरबाग येथील अतिक्रमण हटवताना झालेल्या हिंसाचारात दोन पोलिस अधिका-यांसह २१ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये एसएचओ संतोष यादव आणि मथुरेचे पोलीस अधीक्षक मुकुल व्दिवेदी यांचा समावेश आहे. मथुरेतील जवाहर पार्क येथील २६० एकरच्या परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर स्वाधीन भारत सुभाष सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोळीबार केला.
दोन वर्षापासून या पार्कातील जागेवर सुभाष सेनेने अतिक्रमण केले होते. न्यायालयाचा आदेश असूनही यापूर्वी पोलिसांना ही जागा रिकामी करुन घेता आली नव्हती. उत्तरप्रदेश पोलिस दलाचे प्रमुख जावेद अहमद यांनी सांगितले की, जागा बळकावणारे स्वत:ला सत्याग्रही म्हणत होते. त्यांनी सर्वप्रथम पोलिसांवर गोळीबार केला.
समोरुन जमावाकडून हिंसाचार होत असल्याने जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी आधी पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या आणि अखेर गोळीबार केला. संतोष यादव या एसएचओचा डोक्यात गोळी लागून मृत्यू झाला अशी माहिती दलजीत चौधरी यांनी दिली. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, घटनास्थळी अतिरिक्त कुमक पाठवली आहे. या हिंसाचारात १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
Visuals of Jawahar Bagh(Mathura)where 1 SHO was killed&6 police personnel got injured during anti-encroachment drive pic.twitter.com/G5xoiu04JC— ANI UP (@ANINewsUP) June 2, 2016