मऊ:उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Election 2022) भाजपने मोठा विजय प्राप्त केला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ विराजमान होणार आहेत. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हाच या निवडणुकीत भाजपचा चेहरा होते. काही दिवसांतच योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होणार आहेत. मात्र, यातच आता उत्तर प्रदेशच्या महू कोर्टाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना नोटीस बजावल्याची माहिती मिळाली आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी ही नोटीस बजावल्याचे समजते.
मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी एका जनसभेला संबोधित करताना एक आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपही झाले. या वक्तव्यानंतर एका व्यक्तीने महू येथील निवासी किशोर शर्मा यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हजर होण्यास सांगावे, अशी विनंती केली होती.
नेमके काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ?
योगी म्हणाले होते की, हनुमंत म्हणजेच बजरंगबली असे देवता आहेत, जे स्वतः वनवासी आहेत, गिरीवासी आहेत, दलित, वंचित आहेत, असे वक्तव्य तेव्हा करण्यात आले होते. किशोर शर्मा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एक प्रभावशाली व्यक्तीमत्त्व आहे. तसेच ते राजकीय क्षेत्रात वरिष्ठ आहेत. गोरक्षपीठाचे महंतही आहेत. योगी आदित्यनाथ यांनी केलेले विधान देश, प्रदेश, जाती-जनजाती, धर्म-समाज यांमध्ये अतिशय महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे २८ नोव्हेंबर २०१८ रोजी बजरंगबली हनुमंतांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. एवढेच नव्हे तर बजरंगबली हनुमानांवर श्रद्धा असलेल्या भाविकांच्या भावनाही दुखावल्या गेल्या आहेत.
दरम्यान, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्वेता चौधरी यांनी ही याचिका फेटाळून लावली होती. मात्र, याचिकाकर्त्यांनी जिल्हा कोर्टात दाद मागितली. यानंतर महू कोर्टाने योगी आदित्यनाथ यांना नोटीस बजावली असून, या याचिकेवरील २६ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.