नवी दिल्ली: ईशान्य भारतात बांगलादेशमधून पद्धतशीरपणे लोकांचे लोंढे घुसवले जात आहेत. त्यामुळे या परिसराचा चेहरामोहरा बदलत असून हा पाकिस्तानकडून सुरू असलेल्या छुप्या युद्धाचा भाग आहे. या सगळ्याला चीनकडून पाठबळ पुरवले जात आहे. या माध्यमातून हा भूभाग कायम अशांत ठेवण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न असल्याचे विधान लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केले. ते बुधवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका परिसंवादात बोलत होते. यावेळी त्यांनी ईशान्य भारतातील लोकसंख्येच्या बदलत्या स्वरूपाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी आसाममधील मौलाना बद्रुद्दीन अजमल यांच्या ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ) या संघटनेचे उदाहरण दिले. ही संघटना गेल्या काही वर्षांमध्ये भाजपापेक्षाही वेगाने वाढत आहे. काही वर्षांपूर्वी जनसंघाचे केवळ 2 खासदार होते आणि तरीही भाजपा आज या स्तरावर पोहोचली आहे. परंतु, एआययूडीएफच्या विस्ताराचा वेग थक्क करणारा आहे. ही संघटना भाजपापेक्षा कितीतरी वेगाने विस्तारत चालली आहे. एक दिवस असा येईल की, आपल्याला आसामासंदर्भात काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. आपण आता ईशान्य भारतातील लोकसंख्येच्या स्वरुपावर नियंत्रण ठेवू शकतो, असे मला वाटत नाही. यापूर्वी या परिसरातील केवळ पाच जिल्ह्यांमध्येच मुस्लीमबहुल लोकसंख्या होती. मात्र, आता या जिल्ह्यांची संख्या साधारण 8 ते 9 इतकी झाली आहे. त्यामुळे आता या लोकांना आपल्यात सामावून घेण्यातच शहाणपणा आहे, असे रावत यांनी सांगितले.
'ही' संघटना भाजपापेक्षा वेगाने वाढतेय; लष्करप्रमुखांनी व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 9:45 AM