सध्या संपूर्ण देशभरात वक्फ दुरुस्ती विधेयकाची जोरदार चर्चा सुरू आहे. या विधेयकाला विविध मुस्लीम संघटना आणि नेते सातत्याने विरोध करताना दिसत आहेत. या संदर्भात आता ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. "आमच्यासाठी वक्फ सर्व काही आहे. वक्फचे नुकसान करण्याचा अर्थ, सर्व गोष्टींचे नुकसान करणे आहे," असे रहमानी यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले रहमानी? -मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी म्हणाले, "वक्फ सर्वकाही आहे. आमच्या मशिदी, मदरसे सर्वकाही. वक्फचे नुकसान करण्याचा अर्थ आहे, सर्व गोष्टींचे नुकसान करणे. यामुळे मुस्लिमांचे नुकसान होईल आणि हे आम्हाला कदापी मान्य नाही." यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही निशाणा साधला.
तेलंणाच्या मुख्यमंत्र्यांना खास अपील -मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी म्हणाले, आम्ही तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, त्यांनी हे अजिबात स्वीकारू नये. सर्व विरोधी पक्ष याच्या विरोधात आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. यावेळी रहमानी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, योगींची खास संस्कृती आहे, बुलडोझर संस्कृती. गुन्हेगारांच्या जमिनीवर बुलडोझर चालवतात. यापेक्षा, गुन्हेगाराच्या जमिनी वक्फला देणे चांगले. योगी खोटे बोलतात. मुस्लिमांनी १२०० वर्षे राज्य केले पण कुणालाही कोणतीही समस्या आली नाही.काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ? -तत्पूर्वीमुख्यमंत्री योगी म्हणाले होते, पूर्वी वक्फ ज्या जमिनीवर दावा करायचा, ती त्यांची व्हायची. मात्र आता हे चालणार नाही. आता वक्फच्या नावाखाली कुणीही मालमत्ता हडप करू शकत नाही. तसेच, वक्फ दुरुस्ती विधेयक हे आजच्या काळाची गरज असल्याचेही योगी यांनी म्हटले होते.