अफगाणिस्तानवर(Afghanistan) तालिबानने(Taliban) कब्जा मिळवल्यानंतर तेथील बिघडलेल्या परिस्थितीवर शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जव्वाद यांनी खेद व्यक्त केला आहे. तालिबानविरोधात जग एकत्र येत नाही. जर वेळीच तालिबानला रोखलं नाही तर ते भारतासाठी मोठा धोका बनू शकतात असा सतर्कतेचा इशारा मौलाना कल्बे जव्वाद यांनी एका धार्मिक कार्यक्रमावेळी दिला आहे.
शिया धर्मगुरूने तालिबानला अमेरिका आणि इस्त्राइलनं उभारलेले क्रूर प्राण्यांचे संघटन असल्याची उपमा दिली आहे. या संघटनेत माणसं नाहीत तर क्रूर जनावरं आहेत. जे लहान मुलांनाही सोडत नाहीत. काही वर्षापूर्वी तालिबानने पाकिस्तानातील एका शाळेवर हल्ला करून अनेक निष्पाप लहान मुलांचा जीव घेतला होता. यापेक्षा जास्त क्रूरता काय असू शकते असं मौलाना कल्बे जव्वाद यांनी म्हटलं आहे.
तालिबानींना रोखणं अत्यंत गरजेचे
तालिबानला रोखणं अत्यंत गरजेचे आहे. यावेळी संपूर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्तानवर लागलं आहे. परंतु तालिबानींविरोधात जगभरात एकता दिसून येत नाही. वेळीच तालिबानी कृत्यांना आवर घालायला हवा असं मौलाना कल्बे यांनी सांगितले. अफगाणिस्तानात सध्या खूप चिंताजनक परिस्थिती आहे. तालिबानींनी काबुलवर कब्जा मिळवला आहे. एकीकडे शिया धर्मगुरु अफगाणिस्तानच्या या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे काही असेही नेते आहेत जे तालिबानीच्या या कृत्याचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.
तालिबानी माणसाच्या रुपात जनावर
समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान, खासदार पुत्र आणि AIMPLB प्रवक्ते सज्जाद नोमानी तालिबानच्या समर्थनार्थ उघडपणे भाष्य करत आहेत. सज्जाद नोमानीने भारत सरकारला तालिबानींसोबत चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु मौलाना कल्बे जव्वाद यांनी तालिबानी माणसाच्या रुपात जनावरं आहे अशी घणाघाती टीका केली आहे.
अफगाणिस्तान आणि जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची तुलना
अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्यानं माघार घेतल्यानंतर तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. यानंतर आता जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला अफगाणिस्तानातून धडा घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, केंद्राला जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा करुन 2019 मध्ये रद्द करण्यात आलेला राज्याचा विशेष दर्जा परत देण्याचा आग्रहदेखील केलाय. याशिवाय त्यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची अफगाणिस्तानसोबत तुलना केली आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता काबीज केल्याचा उल्लेख करत माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींनी केंद्राला आमची परीक्षा न घेण्याचा इशारा दिला आणि केंद्र सरकारला "आमचे मार्ग सुधारणे, परिस्थिती समजून घेणे आणि आमच्या शेजारी काय चालले आहे ते पहा, असे म्हणाल्या. तसेच, 5 ऑगस्ट 2019 च्या निर्णयाचा उल्लेख करत 'महाशक्ती असलेल्या अमेरिकेला आपली पिशवी गुंडाळून पळून जावं लागलं. तुम्हाला (केंद्र) जम्मू-काश्मीरवर संवाद सुरू करण्याची संधी आहे,' असंही म्हणाल्या.