नवी दिल्ली: काही वर्षांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा घरवापसी झालेल्या अल हजरत बरेली शरीफचे मौलाना तौकीर रजा खान यांनी बाटला हाऊस एन्काऊंटरसंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. बाटला हाऊसमध्ये मारले गेलेले दहशतवादी नव्हते, तर ती आमची मुले होती. त्यांना शहिदांचा दर्जा द्यायला हवा, अशी मागणी मौलाना तौकीर रजा खान यांनी केली आहे. या वादग्रस्त विधानानंतर एकच खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे.
मी काँग्रेस जवळून पाहिली आहे. मला असे वाटले की, काँग्रेसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS च्या लोकांनी चारही बाजूंनी घेरले आहे. मी नेहमीच काँग्रेसला विरोध केला आहे आणि करत राहीन. आता जेव्हा मी प्रियंका गांधींना भेटलो तेव्हा मला जाणवले की, यावेळी देशात खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष असलेले, लोकशाहीवर विश्वास असलेले दोन भाऊ-बहीण आहेत. बाकी सगळे ढोंगी आहेत, असे मौलाना तौकीर रजा खान यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये येण्याचे कारण स्पष्ट केले. एएनआय वृत्तसंस्थेने एक व्हिडिओ ट्विट केला असून, यामध्ये तौकीर रजा खान यांनी बाटला हाऊस एन्काऊंटरसंदर्भात वादग्रस्त केल्याचे पाहायला मिळत आहे.
बाटला हाऊसमध्ये दहशतवादी नाही, आमची मुले मारली गेली
काँग्रेसने सांगितले होते की, सरकार स्थापन केल्यानंतर आमचे पहिले काम बाटला हाऊस चकमकीची चौकशी करणे असेल. या चकमकीची चौकशी झाली असती, तर जगाला कळले असते की, मारले गेलेले दहशतवादी नव्हते, त्यांना हुतात्मा दर्जा द्यायला हवा. जे इन्स्पेक्टर शर्मा मारले गेले होते, त्यांना त्यांच्या पोलिसांनी मारले होते. तपास न झाल्यास पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होईल. पोलिसांच्या मनोबलाची त्यांना अधिक काळजी असेल. २० कोटी मुस्लिमांच्या मनोबलाची पर्वा केली नाही. आमची मुले दहशतवादी म्हणून मारली गेली. माझ्या तक्रारी नेहमीच काँग्रेसकडे आहेत, असे रजा खान यांनी म्हटले आहे.
आम्ही नेहमीच काँग्रेसच्या विरोधात होतो
आम्ही नेहमीच काँग्रेसच्या विरोधात होतो हे खरे आहे. माझ्याकडून एक चूक झाली ती म्हणजे काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे काँग्रेसलाही आपण जवळून पाहिले आहे. २००९ मध्ये, जेव्हा मी काँग्रेससोबत होतो आणि जिंकलो तेव्हा मी मंचावर सांगितले होते की, काँग्रेसली मी माफ केले आहे असे समजू नये. काँग्रेसने मला आता पॅरोलवर सोडले, भविष्यात तुमचे काम चांगले झाले तर तुमचा विचार केला जाईल, असे मौलाना तौकीर रजा खान यांनी सांगितले.