नवी दिल्ली : आकुंचन पावलल्या हृदयधमन्या खुल्या राहाव्यात यासाठी त्यात बसविण्यात येणाऱ्या स्टेंटच्या विक्रीत होणाऱ्या प्रचंड नफेखोरीला आळा घालण्यासाठी या स्टेंटची कमाल किंमत येत्या १०-१५ दिवसांत ठरविली जाण्याची शक्यता आहे.रासायनिक खते आणि औषधी द्रव्ये खात्याचे मंत्री अनंत कुमार यांनी बुधवारी सांगितले की, ‘नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अॅथॉरिटी’ला (एनपीपीए) स्टेंटच्या किंमती ठरविण्यास सरकारने सांगितले. यासंबंधीचा निर्णय येत्या १०-१५ दिवसांत होणे अपेक्षित आहे. स्टेंटच्या कमाल किंमती ठरल्यावर हृदयरोग्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही कुमार म्हणाले.स्टेंटचे उत्पादन करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या सर्व कंपन्यांनी, सामायिक कमाल किंमती ठरविता याव्यात यासाठी आपापल्या उत्पादन खर्चा ची व त्यावरील नफ्याची माहिती या महिनाअखेर द्यावी, असे ‘एनपीपीए’ने त्यांना सांगितले आहे. यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यासाठी प्राधिकरणाने सर्व संबंधितांची २४ जानेवारी रोजी बैठक बोलावली आहे. ‘एनपीपीए’ ही देशात विकल्या जाणाऱ्या व खास करून जीवनावयक औषधांच्या किंमतींवर नियंत्रण करणारी सर्वोच्च वैधानिक संस्था आहे. गेल्याच वर्षी सरकारने स्टेंटचा जीवनावश्यक औषधांच्या यादीत समावेश केला. त्यामुळे या स्टेंटच्या किंमती हा विषय कायदेशीरपणे ‘एनपीपीए’च्या अधिकारक्षेत्रात आला. स्टेंटवर किंमत छापलेली असली तरी इस्पितळे प्रत्यक्षात त्याचे अव्वाच्या सव्वा दर वसूल करतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)
स्टेंटची कमाल किंमत ठरणार
By admin | Published: January 19, 2017 4:56 AM